अध्यक्षपदासाठी लढत असलेल्या दोन्ही उमेदवारांनी व्यक्त केले मत
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव बार असोसिएशनची निवडणूक जाहीर झाली असून ही निवडणूक 20 रोजी होत आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी दाघे रिंगणात आहेत. त्यांना विचार व्यक्त करण्यासाठी मंगळवारी वेळ देण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी या दोन्ही उमेदवारांनी आपली मते व्यक्त केली. यावेळी दोघांनीही प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आम्ही कार्य करू, असे सांगत विकासाच्या मुद्दय़ावर तसेच वकिलांच्या अडचणी दूर करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
वकील समुदाय भवन येथे अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत असलेले उमेदवार ऍड. डी. एम. पाटील आणि ऍड. प्रभू यतनट्टी यांना विचार व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी ऍड. डी. एम. पाटील यांनी वकिलांच्या समस्या दूर करण्यासाठी न्यायालयामध्ये असलेल्या समस्या निवारण्यासाठी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करू, असे सांगितले. अध्यक्षपद महत्त्वाचे नाही तर बेळगाव बार असोसिएशनचा विकास होणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने मी पाऊल उचलणार असल्याचे सांगितले.
यावेळी दुसरे उमेदवार ऍड. प्रभू यतनट्टी म्हणाले, विशेष करून न्यायालयाच्या परिसरात असलेल्या विविध समस्या दूर करण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. युवा वकिलांना ज्या समस्या निर्माण होत आहेत. त्या समस्या दूर करण्यासाठी माझे प्रयत्न असतील. सर्वांना विश्वासात घेऊन काम करू, असे त्यांनी सांगितले. केवळ अध्यक्षांनाच बोलण्याची मुभा देण्यात आली होती.