क्रीडा प्रतिनिधी /मडगांव
गोवा फुटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत स्पोर्टिंग क्लुब दी गोवा आणि धेंपो स्पोर्ट्स क्लबने विजय नोंदविले. जीएफएच्या धुळेर मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात स्पोर्टिंग क्लुब दी गोवाने कळंगूट असोसिएशनचा 3-1 गोलफरकाने पराभव केला.
लढतीच्या पाचव्याच मिनिटाला स्पोर्टिंग क्लुबच्या गिरीश नाईकच्या कॉर्नरवर एल्टन वाझने गोल केला. 33व्या मिनिटाला गणेश ठाकूरच्या पासवर जॉवितो फर्नांडिसने कळंगूट असोसिएशनला बरोबरी गाठून देणारा गोल केला. त्यानंतर 52व्या मिनिटाला कळंगूटच्या मॅल्विन लोबो याच्याकडून सॅल्फ गोल झाल्याने स्पोर्टिंगला परत एकदा आघाडी प्राप्त झाली. शेवटच्या क्षणी अकेराज मार्टिंन्सने स्पोर्टिंग क्लुब दी गोवाचा तिसरा गोल करून सामना 3-1 असा जिंकून दिला. मडगावच्या चौगुले कॉलेजच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या लढतीत धेंपो स्पोर्ट्स क्लबने विजयाची नोंद करताना एफसी गोवाला 2-1 असे पराभूत केले. लढतीच्या 19व्या मिनिटाला एफसी गोवाच्या ब्रायसन फर्नांडिसने गोल करून संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर धेंपो स्पोर्ट्स क्लबच्या पेदू गोन्साल्वीसने मध्यंतराच्या ठोक्याला गोल करून बरोबरी साधली तर सामन्याच्या 62व्या मिनिटाला क्लूझनर परेराने धेंपो क्लबसाठी विजय गोल नोंदविला.