शुक्रवारपर्यंत तात्पुरती सोय करण्याची पालिकेची हमी : फुटपाथवरील फिरत्या विक्रेत्यांना हटविण्याची मागणी
प्रतिनिधी /फोंडा
वरचा बाजार, फोंडा येथील मुख्य बाजारात जाणारी पायवाट विस्तारीत मार्केट प्रकल्पाच्या कामामुळे बंद केल्याने विक्रेते संतप्त बनले आहेत. ही पायवाट त्वरीत खुली करावी या मागणीसाठी पन्नासहून अधिक विक्रेत्यांनी मंगळवारी फोंडा पालिकेच्या नगराध्यक्ष गिताली तळावलीकर व मुख्याधिकारी योगिराज गोसावी यांची भेट घेतली. तासभर झालेल्या चर्चेनंतर शुक्रवारपर्यंत पायवाटेची तात्पुरती सोय करण्याची हमी विक्रेत्यांना देण्यात आली. बाजारपेठे बाहेर फुटपाथवर व पार्किंगची जागा अडवून बसणाऱया फिरत्या विक्रेत्यांना तेथून दुसऱया जागी हलविण्याची मागणीही यावेळी विक्रेत्यांनी केली.
पायवाट बंद झाल्याने ग्राहक फिरकेना
फोंडा मार्केट प्रकल्पाच्या विस्ताराचे काम गेल्या महिन्याभरापासून सुरु आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठेत ये जा करण्याची पायवाट बंद करण्यात आली आहे. पायवाट बंद झाल्याने एकही ग्राहक बाजारपेठेत फिरकत नसल्याने त्याचा व्यापारावर परिणाम झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मुख्य बाजारपेठेत भाजी, फळ, मसाले व अन्य विक्रेते मिळून साधारण तिनेशहून विक्रेते नियमित व्यावसाय करतात. पायवाट बंद केल्यापासून त्यांना ग्राहक मिळत नसल्याने व्यापार थंडावला आहे. शिवाय बाजारात माल आणणेही अवघड बनले आहे. मार्केटच्या पाठिमागील अप्रोच रोडवरुन बाजारात येणारा दुसरा मार्ग ग्राहकांना सोयिस्कर वाटत नाही. त्यामुळे बहुतेक ग्राहक रस्त्याच्या बाजूला बसणाऱया फुटपाथवरील विक्रेत्यांकडूनच खरेदी करतात. त्याचा थेट परिणाम बाजारपेठेत नियमित सोपो कर भरुन बसणाऱया विक्रेत्यांवर होत आहे. या समस्येवर पालिकेने तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी विक्रेत्यांकडून करण्यात आली.
बांधकाम झटपट पूर्ण करुन पायवाट खुली करा
नगराध्यक्ष गिताली तळावलीकर व मुख्याधिकारी गोसावी यांच्याशी विक्रेत्यांची तासभर चर्चा झाली. पर्यायी व्यवस्था म्हणून मार्केट प्रकल्पाचे काम पूर्ण होईपर्यंत अप्रोच रोडवर बसण्याचा प्रस्ताव मुख्याधिकाऱयांनी त्यांच्यासमोर ठेवला. मात्र विक्रेत्यांनी त्यावर असहमती दर्शविली. सध्या सुरु असलेले बांधकाम झटपट संपवून तात्पुरत्या पायवाटेची सोय करावी या मागणीवर व्यापारी ठाम राहिल्याने अखेर शुक्रवारपर्यंत तशी व्यवस्था करण्याची हमी पालिकेतर्फे देण्यात आली.
फुटपाथवरील विक्रेत्यांना हटवा
दरम्यान बाजारपेठेच्या बाहेर मुख्य रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर बसणाऱया फिरत्या विक्रेत्यांना तेथून दुसऱया जागी हलविण्याची अन्य एक मागणी विक्रेत्यांकडून करण्यात आली. फुटपाथवरील विक्रेत्यांमुळे बाजारपेठेत नियमित सोपो भरुन बसणाऱया विक्रेत्यांना ग्राहक मिळत नाहीत. पार्किंगची जागा अडवून बसणाऱया या फिरत्या विक्रेत्यांमुळे सतत वाहतूक कोंडी होत असते. बुधवारपेठेतील विक्रेत्यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी सातत्याने केली जाते. पण पालिकेने अद्याप त्यावर कायम तोडगा काढलेला नाही. सोपो कंत्राटदाराची माणसेच अतिरिक्त पैसे घेऊन फुटपाथवर बाजार थाटत असल्याचा आरोपही यावेळी विक्रेत्यांनी केली. व्यापाऱयांच्या या मागणीवर उत्तर देताना पथपद विक्रेते कायद्यानुसार पालिकेला या विक्रेत्यांना आधी पर्यायी जागा आखून द्यावी लागेल. त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करुन त्यानुसारच त्यांचे स्थलांतर करावे लागेल. पालिका मंडळाच्या बैठकीसमोर हा विषय मांडून त्याला मान्यता घेऊन पुढची कारवाई करावी लागेल, असे मुख्याधिकारी गोसावी यांनी स्पष्ट केले. मात्र त्यासाठी किती काळ लागेल ते त्यांनी स्पष्ट केले नाही. विक्रेत्यांच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेदरम्यान उपनगराध्यक्ष जया सांवत, नगरसेवक शांताराम कोलवेकर, अमिना नाईक हे उपस्थित होत. शिष्ट मंडळात घारु सावंत, नरेंद्र परब, माया नाईक व अन्य विक्रेत्यांचा समावेश होता.