प्रतिनिधी/ फोंडा
झिंगडीमळ-कुर्टी, फोंडा येथे एका संशयिताला पकडण्यासाठी गेलेल्या ऑन डय़ुटी पोलिस सहाय्यक उपनिरीक्षक व एका पोलीस कॉन्स्टेबलवर प्राणघातक हल्ला झाला. सदर प्रकार काल सोमवारी सायं. 6 वा. सुमारास घडला. या हल्ल्यात एएसआय जितेंद गावडे (जीतू) हा गंभीर जखमी झाला तर त्याचा साथीदार कॉन्स्टेबल जयवंत भरतू हा किरकोळ जखमावर बचावला. जीतू याच्या डोक्यावर 42 टाके पडले असून त्याच्यावर बांबोळी येथील गोमेकॉत उपचार सुरू आहे.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसापासून झिंगडीमळ येथे अमलीपदार्थाची विक्री होत असल्याची टिप पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार फोंडा पोलिसांची टिम घटनास्थळी दाखल झाली होती. संशयितांना सुगावा लागू नये यासाठी जीपगाडी दुसरीकडे वळवून जीतू व भरतू या दोघांनी संशयितांना हटकविण्यासाठी गेले होते. संशयिताने प्रतिकार करून भरतू याला लाथा मारून बाजूला टाकले तसेच हातात असलेली काचेच्या बाटलीने जीतूच्या डोक्यावर घणाघाती प्रहार केला. एकामागून एक प्रहार करून त्याला गंभीर जखमी केले. फुटलेल्या काचा जीतूच्या डोक्यात घुसून तो अत्यवस्थ झाला. त्यानंतर पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोचतोपर्यंत दोघे संशयित यामाहा दुचाकीसह पसार झाले. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत जीतू याला उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी बांबोळी येथे हलविण्यात आले.
याप्रकरणी पोलिसांनी दोघां संशयितांची ओळख पटली असून त्याच्यावर भा.दं.सं. 307 कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याची माहिती उपअधिक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनी दिली. फोंडा पोलीस दोघांही संशयितांचा उशिरा रात्रीपर्यंत शोध घेत होते. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदित्य वेळीप अधिक तपास करीत आहे.