तरुण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी
दिल्लीत अत्यंत गजबजलेल्या हजरत निजामुद्दीन भागात असलेल्या तबलिगी जमात या धार्मिक संस्थेने आयोजित केलेल्या इस्तेमाच्या कार्यक्रमास बार्शी शहरातून ६ जण तर तालुक्यातील पिंपरी ( आर ) येथून ८ जण जाऊन आले असून पोलिस व आरोग्य विभागाने त्यांना मध्यरात्री ताब्यात घेऊन त्यांना तपासणीसाठी सोलापूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये वर्ग करण्यात आले आहे.
बार्शी शहर व तालुक्यात पूणे, मुंबई सह इतर शहरातून आलेल्यांची संख्या सुमारे २० हजारपेक्षा जास्त असून शहरातील व ग्रामीण भागातील नागरिक पोलिस व आरोग्य यंत्रणांना याची माहिती देत आहेत.
बाहेरुन आलेले हे नागरिक स्वतःची कोणतीही तपासणी करीत नाहीत. त्यामुळे शेजारी राहणाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग त्या व्यक्तीस झाला असेल तर आपल्याला होईल, अशी भिती वाटत आहे.
पिंपरी ( आर ) येथील एका नागरिकाने दिल्ली येथून इस्तेमाचा कार्यक्रम आटोपून आलेल्या आठ जणांची माहिती पोलिसांना व ग्रामसेवकास फोन करून देताच वैराग पोलिस निरीक्षक अरुण सुगांवकर यांनी मंगळवारी मध्यरात्री सर्वांना ताब्यात घेऊन तपासणीसाठी सोलापूर येथील मेडीकल कॉलेज रुग्णालयात वर्ग केले.
या घटनेची
माहिती बार्शी शहर पोलिसांना
समजताच पोलिस निरीक्षक संतोष
गिरीगोसावी, सहायक
पोलिस निरीक्षक बबन येडगे
यांनी बार्शीतील दिल्लीला
इस्तेमा कार्यक्रमास जाऊन
आलेले किती नागरिक गेले होते,
याची माहिती घेतली.
शहरातील
वेगवेगळया भागात राहणारे
सहाजण दिल्ली येथील कार्यक्रमास
उपस्थित राहून बार्शीला परतले
होते, अशी माहिती
समोर आली. त्या
सर्वांना आरोग्य विभागाने
पोलिसांच्या मदतीने ताब्यात
घेऊन तपासणीसाठी सोलापूर
येथे सिव्हिल हॉस्पीटल येथे
पाठवले आहे.
बार्शी तालुक्यातील अशा चौदा जणांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. शहर व तालुक्यातील पोलिसांनी या चौदा जणांच्या संपर्कात आलेले मित्र परिवार, शेजारी, कुटुंबिय यांची चौकशी सुरु केली असून त्यांना स्वतःची काळजी घेण्याचे तसेच त्रास जाणवला तर त्वरीत संपर्क करावा. अशा सूचना देण्यात आल्या आहेत.