संशयित महिलेला सालेली-सत्तरीत अटक
उदय सावंत / सालेली सत्तरी
बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमधून एक वर्षीय बालकाच्या अपहरण प्रकरणामुळे संपूर्ण गोव्यामध्ये खळबळ माजली होती. या प्रकरणाला अखेर पूर्णविराम मिळाला. वाळपई, आगशी, डिचोली या तिन्ही पोलीस स्थानकाच्या अधिकारी व पोलीस कर्मचाऱयांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे अखेर सालेली-सत्तरी येथील संशयित महिला विश्रांती गावस हिला याप्रकरणी अटक करण्यात आली. तिच्याकडून अपहरण करण्यात आलेले बालक सुखरूपरित्या ताब्यात घेतलेले आहे. यामुळे पोलीस खात्याच्या अधिकाऱयांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
पोलिसांसमोर होते मोठे आव्हान
शुक्रवारी दुपारी गोवा मेडिकल कॉलेजमधून एक वषीय बालकाचे अपहरण करण्यात आल्याची वार्ता पसरल्यानंतर गोव्यात एकप्रकारे खळबळ निर्माण झाली होती. यामुळे गोव्याच्या पोलीस यंत्रणेसमोर अपहरण करणाऱया बाईचा शोध घेण्याचे मोठे आव्हान होते. यामुळे शुक्रवारी संध्याकाळपासून आगशी पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजय राणे, डिचोली पोलीस स्थानकाचे निरीक्षक महेश गडेकर, वाळपई पोलीस स्थानकाचे निरीक्षक सागर एकोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळय़ास्तरावर चौकशी सुरू करण्यात आली होती. शुक्रवारी रात्रीपर्यंत ते शनिवारी सकाळपर्यंत वेगवेगळय़ास्तरावर चौकशीला प्रारंभ करण्यात आला होता. शेवटी शनिवारी दुपारी संशयित महिला विश्रांती गावस हिला अपहरण करण्याच्या प्रकारावरून ताब्यात घेण्यास पोलीस यंत्रणा यशस्वी ठरली. पोलीस स्थानकाच्या सर्व अधिकाऱयांना यासंदर्भात तपास करण्याचे आदेश पोलीस खात्याच्या वरि÷ अधिकाऱयांनी दिले होते, त्यामुळे पोलीस खात्याची यंत्रणा शुक्रवारपासून कामाला लागली होती. वाळपई पोलीस स्थानकाचे निरीक्षक सागर एकोस्कर यांनी यासंदर्भात आव्हान स्वीकारून अपहरणाचा तपास शुक्रवारी संध्याकाळपासून सुरु केला होता.
‘नवदुर्गा’ बसमुळे झाला उलगडा
दरम्यान, यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार संशयित महिला विश्रांती गावस ही सदर अपहरण केलेल्या बालकाला घेऊन मुळगाव याठिकाणी येऊन उतरली. त्यानंतर ‘नवदुर्गा’ या प्रवासी बसमध्ये चढली. सदर बस वाळपई या ठिकाणी जायला निघाली होती. सीसीटीव्ही फुटेजवरून यासंदर्भाची माहिती पोलीस यंत्रणेने गोळा केली. या आधारे पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी अधीक्षक शोबित सक्सेना, उपअधीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोली पोलीस निरीक्षक महेश गडेकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रजित मांद्रेकर, पोलीस साहाय्यक उपनिरीक्षक प्रदीप गवस, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय तिरोडकर, रूपेश आजगावकर, गौरव वायंगणकर, परेश गावकर, गौरेश नाईक, अनिरूद्ध पालीकर, निखिल गावस, विजय करमाळकर, सदानंद मळीक व त्यांच्या टीमने या संदर्भात चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यांनी सर्वप्रथम नवदुर्गा प्रवासी बसच्या कंडक्टरला गाठले व सदर महिलेसंदर्भात चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार ही महिला सदर बालकाला घेऊन सालेली बसस्टॉपवर उतरल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शनिवारी सकाळी दिवसभर गावात मोठय़ा प्रमाणात पोलिसांनी चौकशी केली. अधिक चौकशीअंती संशयित महिला विश्रांती गावस हिला ताब्यात घेण्यात आले. सदर बालकाचे आपण अपहरण केल्याचे तिने मान्य केले. यामुळे बालकाच्या शोधाच्या नाटय़ावर अखेर पडदा पडला.
यासंदर्भाची माहिती वरि÷ अधिकाऱयांना देण्यात आल्यानंतर संध्याकाळी उशिरापर्यंत वेगवेगळय़ा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तसेच अन्य पोलीस फौजफाटा मोठय़ा प्रमाणात सालेली गावांमध्ये तैनात करण्यात आला. चौकशी केल्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले व डिचोली पोलीस स्थानकावर नेण्यात आले. त्या ठिकाणी कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केल्यानंतर तिला अटक करण्यात आली. पुढील अधिक चौकशीसाठी या संशयित महिलेला आगशी पोलीस स्थानकाच्या ताब्यात देण्यात आले.
मातेने मुलाला ओळखले
दरम्यान, अपहरण प्रकरणात संशयित आरोपी म्हणून विश्रांती गावस हिला ताब्यात घेण्यात आल्यानंतर सदर बालकाच्या मातेला बोलाविण्यात आले. डिचोली पोलीस स्थानकावर आल्यानंतर सदर मातेने बालकाची ओळख पटविली. अपहरण करण्यात आलेले बालक आपले असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर पोलिसांना खात्री पटली व संशयित विश्रांती गावस हिला अटक करण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून संशयिताला ताब्यात घेण्यात आले व पुढील चौकशीसाठी आगशी पोलीस स्थानकावर नेण्यात आले आहे.
पोलीस फौजफाटय़ामुळे सालेलीवासियांत भीती
दरम्यान, सालेली गावात अचानकपणे पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये एकप्रकारची भीती निर्माण झाली. पोलीस तैनात केल्यामुळे गावात चर्चा सुरू झाली. नंतर पोलीस यंत्रणेने संशयित महिला विश्रांती गावस हिचे घर गाठले. सुमारे एक महिन्यापूर्वी विश्रांती गावस हिने एका मुलीला जन्म दिला आहे. अचानकपणे पोलीस तिच्या घरासमोर येऊन थांबल्यामुळे नागरिकांत चर्चेला उत आला. शेवटी बालकाचे अपहरण प्रकरणात तिचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नागरिकांना समजले. दरम्यान, संशयित महिला विश्रांती गावस हिने सदर बालकाचे अपहरण का केले, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.