धरणावरील घटना : बांदा शहरावर शोककळा
प्रतिनिधी / बांदा:
वाफोली धरणावर पर्यटनासाठी गेलेल्या बांदा येथील अमित अनंत सावंत (32, रा. बांदा-पानवळ) या युवकाचा बुलेटवरील ताबा सुटून अपघाती मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडला. अमित यांची पत्नी ही मुलगा व मैत्रिणीसह धरणावर पर्यटनासाठी आली होती. पत्नीच्या डोळय़ासमोरच अमित यांचा अपघात झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमित सावंत यांची पत्नी सावंतवाडीहून इन्सुली येथे हळदीकुंकवासाठी आली होती. दरम्यानच्या काळात पर्यटनासाठी म्हणून त्यांनी वाफोली धरणावर जायचे ठरविले. चारच्या सुमारास चौघीजणी वाफोली धरणावर गेल्या. काहीच वेळात आपण धरणावर येतो, असे अमित यांनी पत्नीला मोबाईलवर सांगितले. मात्र, पत्नीने येऊ नको, असे सांगितले. मात्र, लहान मुलाने धरणावर येण्यासाठी त्यांच्याकडे हट्ट केला.
त्यानंतर अमित बुलेटने (एमएच-07/एके-7233) वाफोली धरणावर येण्यास निघाला. वाफोली धरणावर ते आले असता त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी सुमारे दहा फूट झाडीत कोसळली. वेग मोठा असल्याने अमित एका बाजूला फेकले गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यावेळी जवळच असलेल्या अमित यांच्या पत्नीने तेथे धाव घेतली. ती नर्स असल्याने पतीचा मृत्यू झाल्याचे तिच्या लक्षात आले. लागलीच सोबत असलेल्यांनी याबाबतची माहिती बांद्यात दिली. याबाबतची खबर अमित यांच्या पत्नीची मैत्रीण गुलाबी भगवान कारिवडेकर (रा. कारिवडे) यांनी बांदा पोलिसांत दिली. अपघात झाल्याचे समजताच घटनास्थळी बांदा व वाफोलीवासीयांनी धाव घेतली.
बांदा पोलीस कॉन्स्टेबल पावसकर यांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविला. गुरुवारी शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. अमित यांच्या अपघाती निधनाने शहरावर शोककळा पसरली आहे. बांदावासीयांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठी गर्दी केली होती. अमित यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व भाऊ असा परिवार आहे.