बेंगळूर/प्रतिनिधी
देशात इंधन दरवाढ दिवसेंदिवस सुरूच आहे. पेट्रोलचे दर १०० रुपयांवर गेले आहेत. दरम्यान इंधन दरवाढीमुळे सामान्य जनता हैराण झाली आहे. वाढत्या इंधन दरवाढीवरून काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. देशभरात इंधन दरवाढीवर काँग्रेस आंदोलन करत आहे. दरम्यान बेंगळूरमध्ये कर्नाटक काँग्रेसनेही आज इंधन दरवाढीचा कार्यकर्ते आणि नेत्यांनी निषेध नोंदविला.
पक्षाने देशव्यापी निषेध करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आज राज्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवुकुमार, विरोधीपक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आणि अन्य नेत्यांनी या निषेधात सहभाग घेतला.
दरम्यान आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध केला. तसेच यावेळी इंधन दरात कपात करण्याची मागणीही केली. यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.