बेंगळूर/प्रतिनिधी
बृहत बेंगळूर महानगर पालिकेने बीबीएमपी)दिलेल्या माहितीनुसार ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या ६८ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला असल्याचे सांगितले. बीबीएमपीच्या आकडेवारीनुसार, सुमारे ३५ लाख लोकांना लसीचे ४८ लाख डोस दिले गेले आहेत. बेंगळूरमध्ये १८ वर्षांवरील वयाच्या व्यक्तींची संख्या ९०,६०,३२७ असून ते लस घेण्यास पात्र आहेत, तर, ३४,७०,९६२ म्हणजेच ३९ टक्के लोकांना प्रथम डोस मिळाला आहे.
बेंगळूरमध्ये सुमारे ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे २५ लाख लोक आहेत आणि त्यापैकी जवळजवळ १८ लाख लोकांना किमान एक डोस मिळाला आहे. तर पाच लाख लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. लसीकरण बेंगळूर लवकरच लसीकरण कव्हरेजमध्ये मुंबईला मागे टाकू शकेल, असे बीबीएमपी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
शहर प्रशासनाचा अंदाज आहे की १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकसंख्या ६५ लाख आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मेच्या सुरुवातीच्या दिवसात अनेक त्रुटी असतानाही या वयोगटातील सुमारे १७ लाख लोकांनाप्रथम डोस मिळाला आहे.
दरम्यान बीबीएमपीचे मुख्य आयुक्त गौरव गुप्ता म्हणाले: “सुरुवातीला लसीचा तुटवडा असण्याची आव्हाने होती, पण ती दूर केली गेली आहे. आम्ही शहरातील लोकसंख्येच्या ६० ते ७० टक्के लसीकरणाच्या मार्गावर आहोत आणि यामुळे आम्हाला तिसर्या लहरीसाठी अधिक सज्ज आहोत, असे ते म्हणाले.