बेंगळूर/प्रतिनिधी
बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार असून, केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी देण्यात येणार आहे. दरम्यान सत्तारूढ भाजपच्या उमेदवाराबाबत अद्याप संशय कायम आहे.
सतीश हे भाजपच्या रमेश जारकिहोळी यांचे बंधू आहेत. ज्यांनी नुकत्याच एका लैंगिक सीडी घोटाळ्याच्या प्रकरणात जलसंपदा मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान आमदार सतीश यांना लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरु आहेत. भाजपला तगडा उमेदवार देण्यासाठी काँग्रेस सतीश यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविणार आहेत.
केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि इतर वरिष्ठ कार्यकर्त्यांनी सतीश यांच्या नावाची शिफारस उच्च कमांडकडे केली असल्याची माहिती आहे. माजी खासदार प्रकाश हुक्केरी आणि कॉंग्रेसचे आमदार लक्ष्मी हेब्बळकर यांचे भाऊ चन्नाराज हंपीहोळी हेही या शर्यतीत होते, परंतु पक्षाने बेळगाव जिल्ह्यातल्या जारकिहोळी कुटुंबाचा आवाका लक्षात घेता सतीश यांच्या नावाला पसंती दिली. शिवकुमार म्हणाले, “बाळगावलोकसभेच्या जागेसाठी आम्ही फक्त एकच नाव हाय कमांडला पाठवले आहे.” असे ते म्हणाले.