ऑनलाईन टीम / घाटकोपर :
चेंबूर पोलीस स्टेशन समोर बसंत पार्क येथे मंगळवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास एका बेस्ट बसला अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, या बसच्या चालकाला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याचा बसवरील ताबा सुटला आणि बस फुटपाथवरील भाजीच्या दुकान घुसून सिग्नलला थांबली. हरिदास पाटील असे या बस चालकाचे नाव असून त्यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बस क्रमांक 381 घाटकोपर स्थानक पूर्व येथून टाटा वीज केंद्र चेंबूर येथे जात होती, त्याचवेळी हा अपघात झाला. रस्त्यावरील तसेच बसमधील कुणीही जखमी झालेले नसून या बसमध्ये 10 ते 12 प्रवासी होते. घटनास्थळी चेंबूर आणि वाहतूक पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करीत आहेत.