भाजप प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांची माहिती : पाहणीनंतर अहवाल तयार करून महामार्ग प्राधिकरणकडे देणार
वार्ताहर / कणकवली:
कणकवली शहरातील बॉक्सेल ब्रिजचे त्रयस्थ कन्सल्टंन्टमार्फत ऑडिट करून येथील बॉक्सेलच्या ठिकाणी फ्लाय ओव्हर ब्रिज करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यासाठी कोल्हापूर येथील कन्सल्टंन्ट मंगळवारी सकाळी 10 वा. कणकवलीत येणार आहेत. त्यांच्यामार्फत बॉक्सेल पुलाचा अहवाल तयार करून न. पं.मार्फत तो अहवाल महामार्ग प्राधिकरणकडे सोपविण्यात येणार आहे. फ्लाय ओव्हर ब्रिजच्या कामासाठीचा प्रस्ताव व बॉक्सेलच्या कामाचा प्रस्ताव केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे देऊन त्याबाबतचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती भाजप प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांनी दिली.
रविवारी हायवेच्या अधिकाऱयांसोबत न. पं.मध्ये झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने जठार यांनी सोमवारी न. पं.मध्ये नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याशी चर्चा केली. न.पं.चा त्रयस्थ कन्सल्टंन्ट म्हणून कोल्हापूर येथील आरसीसी कन्सल्टंन्ट प्रशांत हावळ यांना न. पं.मार्फत बॉक्सेल ब्रिजची पाहणी करून अहवाल देण्याबाबत पत्र दिले आहे. नगराध्यक्षांनी तसे पत्र संबंधीत कन्सल्टंन्ट यांना दिले आहे. कणकवली शहरातील जनतेच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने त्रयस्थ म्हणून न. पं. हा कन्सल्टंन्ट नियुक्त केला आहे. या कन्सल्टंन्टमार्फत मंगळवारी कणकवलीतील बॉक्सेल ब्रिजची पाहणी करून प्रत्यक्ष पाहणीचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे जठार यांनी सांगितले.
हावळ यांनी बॉक्सेल ब्रिजची पाहणी केली, की त्याबाबतचा अहवाल ते नगराध्यक्षांकडे सादर करणार आहेत. नगराध्यक्षांमार्फत हा अहवाल महामार्ग प्राधिकरणकडे सादर करण्यात येईल. या पाहणीवेळी बॉक्सेलच्या ठिकाणी फ्लाय ओव्हर ब्रिज करण्यासाठी प्रस्ताव करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव व पाहणी अहवाल महामार्ग प्राधिकरणकडून वरिष्ठ कार्यालयाकडे गेल्यानंतर त्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत फ्लाय ओव्हर ब्रिज मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे जठार यांनी सांगितले.