ऑनलाईन टीम / जोधपूर :
राजस्थानच्या भंवरी देवी अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि माजी मंत्री महिपाल मदेरना यांचे आज सकाळी 7.40 वाजता जोधपूरमध्ये निधन झाले. ते 69 वर्षांचे होते.
राजस्थान काँगेसचे नेते महिपाल मदेरना हे गेहलोत सरकारमध्ये जलसंपदा मंत्री होते. भंवरी देवी अपहरण आणि हत्या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांना मंत्रीपदावरुन हटविण्यात आले होते. सध्या ते जामीनावर बाहेर होते. मागील काही वर्षांपासून त्यांना कर्करोगाने ग्रासले होते. त्यामुळे उपचारांसाठी ते अनेकदा जामीनावर बाहेर आले होते. आज सकाळी 7.40 वाजता जोधपूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मदेरना यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी चाडी येथे नेण्यात येईल. तेथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भंवरी हत्याकांडानंतर तुरुंगात
सप्टेंबर २०११ मध्ये भंवरी देवी हत्याकांडाची देशभरात चर्चा झाली होती. त्यावेळी महिपाल मदेरणा हे अशोक गेहलोत यांच्या सरकारमध्ये जलसंपदा मंत्री होते. भंवरी देवी यांच्यासोबतची कथित सीडी समोर आल्यानंतर महिपाल मदेरणा यांची गच्छंती झाली होती. या प्रकरणानंतर ते तुरुंगात होते.