दिवसभरात सात घरफोडय़ा, चोऱया, घरफोडय़ांच्या सत्राने नागरिक चिंतातूर, बंद घरे चोरटय़ांचे लक्ष्य
प्रतिनिधी/ बेळगाव
उपनगरांमध्ये चोऱया, घरफोडय़ांच्या घटना वाढल्या आहेत. सोमवारी दिवसभरात शहापूर, विजयनगर, जयनगर, गोकुळनगर, रामतीर्थनगर परिसरात सात बंद घरे फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लांबविण्यात आली आहे. सोमवारी चोरटय़ांनी दिवसभरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. चोऱया, घरफोडय़ांच्या सत्राने एकच खळबळ माजली आहे.
या चोऱयांमागे एकच टोळी कार्यरत आहे की वेगवेगळय़ा टोळय़ा सक्रिय आहेत. याचा तपास करण्यात येत आहे. चोऱयांच्या सत्राने पोलीस अधिकारीही हबकून गेले आहेत. एपीएमसी, शहापूर, माळमारुती पोलीस स्थानकात या चोरी प्रकरणांची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
भोज गल्ली, शहापूर येथील चंद्रकला मल्लाप्पा फुटाणे यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बारा तोळे सोन्याचे दागिने व 13 तोळे चांदी असा एकूण पावणे तीन लाखाचा ऐवज चोरटय़ांनी लांबविला. सोमवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार पुढील तपास करीत आहेत.
तर रामतीर्थनगर येथील नाडगौडा पाटील यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी तिजोरीतील सहा तोळे सोन्याचे दागिने व 10 हजार रुपये रोख रक्कम लांबविली आहे. सोमवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली असून घटनेची माहिती समजताच माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. या संबंधी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
जयनगर, हिंडलगा रोड येथील शामराव सुब्राव पाटील यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी 1 लाख 24 हजार रुपये रोख रक्कम पळविली आहे. शामराव व त्यांची पत्नी सोमवारी दुपारी गांधीनगर येथील लाकडाच्या अड्डय़ावर गेले होते. 3 ते 4 यावेळेत ही घटना घडली.
गोकुळनगर परिसरात तीन घरे फोडली
गोकुळनगर परिसरात तीन घरे फोडण्यात आली आहेत. अशोक शिवाप्पा कापसे यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून 7 तोळे सोन्याचे दागिने व 50 हजार रुपये रोख रक्कम चोरटय़ांनी पळविली. तर परशराम सुब्राव पाटील यांच्या घरातून 8 तोळे सोन्याचे दागिने व 9 हजार रुपये रोख रक्कम पळविली आहे. याच परिसरातील मनोहर फकिरा कोलकार यांच्या घरातून 4 तोळे सोन्याचे दागिने व 50 हजार रुपये रोख रक्कम पळविण्यात आली आहे.
या घटनांची एपीएमसी पोलीस स्थानकात नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी, उपनिरीक्षक लक्ष्मण कट्टी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. भर दिवसा उपनगरांमध्ये घडलेल्या चोऱया, घरफोडय़ांच्या सत्राने नागरिक हैराण झाले आहेत.
विजयनगर येथे घरफोडी
दरम्यान कॅम्प पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील विजयनगर येथेही घरफोडीची घटना घडली आहे. मात्र पोलिसांनी किरकोळ प्रकार असल्याचे सांगून एफआयआर दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याची माहिती मिळाली आहे. चोऱया, घरफोडय़ा रोखण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी घडलेल्या गुह्यांसंबंधी एफआयआर दाखल करून घेण्यास टाळाटाळ करण्याचा सपाटा काही पोलीस अधिकाऱयांनी सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.