प्रतिनिधी / बेळगाव
भाजीपाल्याच्या दराबाबत सर्वसामान्यांना या आठवडय़ातही दिलासा मिळाला आहे. गॅस-तेलाच्या किमती वाढताना भाजीपाला मात्र स्वस्त असल्याने समाधान व्यक्त होत आहे. शनिवारच्या आठवडी बाजारात गत आठवडय़ाच्या तुलनेत भाजीपाल्याचे दर आवाक्यात आहेत.
बाजारात पालेभाज्यांबरोबरच फळभाज्याही मोठय़ा प्रमाणात दाखल झाल्या आहेत. टोमॅटोपासून मेथीचे दर आवाक्यात आल्याने आहारात विविध भाज्यांची चव चाखण्याची संधी मिळत आहे. गाजर, वाटाणा, काकडी यांचीही आवक वाढली आहे. यामुळे किरकोळ विक्रेत्यांतून भाजीपाल्याचे दर कमी झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
बाजारपेठत फ्लॉवर 10 रु. एक नग, ढबू मिरची 35 ते 40 रु. किलो, बिन्स 25 ते 30, गाजर 25 ते 30 रु., टोमॅटो 12 ते 15 रु. किलो, मिरची 40 रु., वाटाणा 40 रु. किलो, कोबी 10 रु. 2 नग, भेंडी 45 ते 50 रु. किलो, दोडकी 50 रु. किलो, वाली शेंगा 40 रु. किलो, शेवगा 20 रु. 4 शेंगा असा दर असून पालेभाज्यांचे दर कमी आहेत. मेथी 10 रु. 2 जुडी, कोंथिबिर 5 रु. 1 जुडी, पालक 10 रु. 4 जुडी, पुदिना 10 रु. 3 जुडी, कांदा पात 10 रु. 2 जुडी असा दर आहे.
लिंबूचा दर वाढला
सध्या लिंबूचे दर वाढले असून शेकडा दर 300 रु. तर पोते 3 हजार असा दर आहे. यामुळे किरकोळ स्वरुपात लिंबूच्या दरात वाढ झाली आहे. काकडीदेखील दाखल झाली असून किलोचा दर 40 ते 50 रुपये आहे.