वृत्तसंस्था /नॉर्थम्प्टन
यजमान इंग्लंडविरुद्ध भारतीय महिला क्रिकेट संघ आज (शुक्रवार दि. 9) पहिल्या टी-20 सामन्यासाठी मैदानात उतरेल, त्यावेळी हरमनप्रीत कौर खराब फॉर्ममधून बाहेर पडण्यासाठी व झगडणाऱया फलंदाजी लाईनअपला उभारी देण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्नशील असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, ही लढत रात्री 11 वाजता खेळवली जाणार आहे.
हरमनप्रीतला नोव्हेंबर 2018 पासून या छोटेखानी क्रिकेट प्रकारात एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. शफाली वर्मा व स्मृती मानधना उत्तम बहरात आहेत. मात्र, संघव्यवस्थापनाला या दोघींकडून अधिक सातत्याची अपेक्षा आहे. या दौऱयात उत्तम योगदान देत असलेली स्नेह राणा या लढतीच्या माध्यमातून फेब्रुवारी 2016 नंतर आपली पहिलीच टी-20 खेळेल. 17 वर्षीय रिचा घोषला देखील येथे अंतिम संघात संधी मिळू शकते.
भारतीय संघ या मालिकेसाठी अद्याप लिसेस्टर येथे सराव करत असल्याने त्यांनी खेळपट्टी पाहिलेली नाही. मात्र, इंग्लंडसारख्या कसलेल्या संघाला सामोरे जाताना किमान 150 धावा जमवण्याचे लक्ष्य ठेवणे आवश्यक असेल, असे चित्र आहे.
दुसरीकडे, इंग्लंडने या मालिकेसाठी सलामीवीर डॅनी वॅटला पुनरागमनाची संधी दिली आहे. लॉरेन विनफिल्ड-हिलच्या गैरहजेरीत डॅनी वॅट ही टॅमी ब्युमाँटच्या साथीने सलामीला उतरेल, असा होरा आहे.
संभाव्य संघ
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, रिचा घोष, हरलीन देओल, स्नेह राणा, तानिया भाटिया, इंद्राणी रॉय, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त, राधा यादव, सिमरन दिल बहादूर.
इंग्लंड : हिदर नाईट (कर्णधार), टॅमी ब्युमाँट, कॅथरिन ब्रन्ट, प्रेया डेव्हिस, सोफिया डंकली, सोफी इक्लेस्टोन, फॅरन्ट, साराह ग्लेन, ऍमी जोन्स, नॅट स्कीव्हर, अन्या श्रबसोल, मॅडी डीव्हिलियर्स, प्रॅन विल्सन, डॅनी वॅट.
सामन्याची भारतीय प्रमाणवेळ : रात्री 11 वा.