मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : लक्ष्य सेन, शुभंकर पात्रता फेरीतच गारद
वृत्तसंस्था/ कौलालंपूर
भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला मलेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळविण्यात अपयश आले तर सात्विकराज रनकिरेड्डी व चिराग शेट्टी यांना दुहेरीच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला.
लक्ष्य सेनला पात्रता फेरीतील चुरशीच्या लढतीत डेन्मार्कच्या हान्स क्रिस्तियन सोलबर्ग व्हिटिंघसकडून 21-11, 18-21, 14-21 असा पराभव स्वीकारावा लागला. ही लढत 49 मिनिटे रंगली होती. आणखी एक भारतीय शुभंकर डे हादेखील मुख्य फेरीत प्रवेश मिळवू शकला नाही. त्याला मलेशियाच्या लू डॅरेनने 21-15, 21-15 असे हरविले. भारतासाठी सर्वात मोठा धक्का बसला तो पुरुष दुहेरीत. जागतिक क्रमवारीत 12 व्या स्थानावर असणाऱया सात्विकराज-चिराग यांनी जोरदार संघर्ष केला. पण जागतिक क्रमवारीत 19 व्या स्थानावर असणाऱया मलेशियाच्या आँग यू सिन व टेव ई यी यांच्याकडून पहिल्या फेरीतच 15-21, 21-18, 15-21 असा पराभव स्वीकारावा लागला. 52 मिनिटे ही लढत रंगली होती.
भारतासाठी या स्पर्धेचा पहिला दिवस निराशाजनकच ठरला. महिला दुहेरीत पूजा दंदू व संजना संतोष यांनाही मुख्य फेरीत स्थान मिळविता आले नाही. इंडोनेशियाच्या सिती फदिया सिल्वा रामाधंती व रिबका सुगिआर्तो यांनी त्यांच्यावर 21-15, 21-10 अशी मात केली.
बुधवारी पारुपल्ली कश्यपची सलामीची लढत जपानचा अग्रमानांकित केन्टो मोमोटाशी तर किदाम्बी श्रीकांतची सलामी तैपेईचा द्वितीय मानांकित चौ तिएन चेनशी होणार आहे. अन्य भारतीयांमध्ये समीर वर्मा पहिल्या फेरीत थायलंडच्या कांताफोन वांगचारोनविरुद्ध, एचएस प्रणॉय जपानच्या कांता त्सुनेयामाविरुद्ध, बी. साई प्रणीत डेन्मार्कच्या रासमुस गेम्केविरुद्ध खेळणार आहेत. महिला एकेरीत जागतिक सहाव्या मानांकित पीव्ही सिंधूची मोहीमही बुधवारी सुरू होणार असून रशियाच्या एवगेनिया कोसेत्स्कायाशी तर सायना नेहवालची बेल्जियमच्या लियान टॅनशी पहिली लढत होणार आहे. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा व एन.सिक्की रेड्डी यांना पहिल्या फेरीत कठीण सामना असून चीनच्या अग्रमानांकित झेंग सि वेई व हुआंग या किआँग यांच्याशी त्यांची सलामीची लढत होणार आहे.