ऑलिम्पिक हॉकी – बलाढय़ ऑस्ट्रेलियाला नमवित पहिल्यांदाच मिळविले ऐतिहासिक यश
वृत्तसंस्था/ टोकियो
दृढनिर्धाराने उतरलेल्या भारतीय महिला हॉकी संघाने साहसी खेळाचे प्रदर्शन करीत तीन वेळच्या चॅम्पियन व जागतिक द्वितीय मानांकित ऑस्ट्रेलियाचा एकमेव गोलने पराभव करून उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. ऑलिम्पिक इतिहासात भारतीय महिला हॉकी संघाने पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम केला. बुधवारी अर्जेन्टिनाविरुद्ध भारताची उपांत्य लढत होणार आहे. अर्जेन्टिनाने जर्मनीचे आव्हान संपुष्टात आणले.
रविवारी भारताच्या पुरुष हॉकी संघाने 49 वर्षांनंतर उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम केल्यानंतर महिलांनीही त्यांचाच कित्ता गिरविताना जिगरबाज आणि धाडसी खेळ करीत ऑस्ट्रेलियाला नमविले. डॅगफ्लिकर गुरजित कौरने अगदी मोक्याच्या क्षणी 22 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून ऑस्ट्रेलियाला चकित केले. या सामन्यात उतरताना ऑस्ट्रेलियाचेच पारडे जड होते. कारण आतापर्यंत ते अपराजित राहिले होते. अशा संघाशी क्रमवारीत नवव्या स्थानावर असणाऱया भारताचा मुकाबला होणार होता, त्यामुळे ऑस्ट्रेलियालाच फेवरिट मानले जात होते. ‘आम्ही अतिशय खुष आहोत. कित्येक दिवसापासून आम्ही केलेल्या कठोर मेहनतीचेच हे फळ आहे. 1980 मध्ये आम्ही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलो होतो. पण यावेळी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली, हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे,’ असे सामन्यात एकमेव गोल नोंदवणारी गुरजित कौर म्हणाली. ‘आमचा हा संघ म्हणजे पुटुंब असून आम्ही एकमेकांना पाठिंबा देतो आणि देशवासियांचाही आम्हाला पाठिंबा मिळत आहे. खुप आनंदात आहोत आम्ही,’ अशा भावना तिने व्यक्त केल्या.
आपली क्षमता दाखवून देण्याच्या इराद्याने उतरलेल्या भारताने जबदरस्त आणि धाडसी खेळ करीत ऑस्ट्रेलियावर किमान फरकाने विजय मिळविला. संघासाठी आणि संपूर्ण भारतीयांसाठीच हा विजय किती महत्त्वाचा होता, हे त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांतूनच लक्षात येते. भक्कम बचाव करीत दुसऱया सत्रात मिळविलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखल्यानंतर सामना संपल्याची शिटी वाजली आणि सर्व खेळाडूंनी एकमेकींना आलिंगन देत जल्लोष सुरू केला. मुख्य प्रशिक्षक सोएर्द मारिने यांनीही त्यांच्यात सामील होत जल्लोष केला, त्यावेळी त्यांच्या डोळय़ातूनही आनंदाश्रू ओघळताना दिसले. 1980 मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिलांनी सहा संघांत चौथे स्थान मिळविले होते, हीच त्यांची ऑलिम्पिकमधील आजवरची सर्वोत्तम कामगिरी होती. त्यावर्षी ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकीचा प्रथमच समावेश केला होता आणि राऊंड रॉबिन पद्धतीने सामने खेळविले गेले होते. यातील अव्वल दोन संघांत अंतिम लढत खेळविण्यात आली होती.
भारताने येथील सामन्यात सावध सुरुवात केली आणि सामना पुढे सरकेल तसा त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला. मात्र ऑस्ट्रेलियाला गोलच्या दिशेने पहिला फटका मारण्याची संधी मिळाली. ऍम्रोसिया मॅलोनने सर्कलमधून मारलेला स्लॅप शॉट सविताने यशस्वीरीत्या थोपवला. यानंतर मात्र भारतीय महिलांनी आक्रमक धोरण अवलंबत ऑस्ट्रेलियावर अनेकदा चढाया केल्या आणि त्यांच्या बचावफळीवर दडपण आणले. भारताचा वेग आणि निर्धार पाहून ऑस्ट्रेलियन्सही चकित झाले आणि बचाव करताना तेही गोंधळूनही गेले. पहिल्या सत्रात सुदैवानेच त्यांना गोल वाचवता आला. नवव्या मिनिटाला कर्णधार राणी रामपालने वंदना कटारियाच्या फटक्याला गोलच्या दिशेने डिफ्लेक्ट केले. पण तो गोलपोस्टच्या बाहेर लागल्याने भारताची ही संधी वाया गेली. पुढच्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या ब्रोक पेरिसने मारलेला फटका डाईव्ह मारणाऱया गोलरक्षक सवितापासून खूप दूरवरून बाहेर गेला. या सत्रात आणखी एक संधी भारताला मिळाली, पण ऑस्ट्रेलियन गोलरक्षक रॅचेल लीन्चने पुढे येत शर्मिला देवीला गोल करण्यापासून रोखले. यावेळी शर्मिला जखमी झाल्याने ती मैदानाबाहेर गेली.
दुसऱया सत्रात ऑस्ट्रेलियानेही आक्रमण तेज केले आणि 20 व्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण भारतीयांनी त्यावर अप्रतिम बचाव केला. पुढच्याच मिनिटाला भारताने पहिला पेनल्टी कॉर्नर मिळविला आणि आतापर्यंत अपेक्षित कामगिरी करू न शकलेली गुरजित कौर यावेळी मात्र गोल नोंदवण्यात यशस्वी ठरली. ऑस्ट्रेलियाने नंतर अखेरपर्यंत बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले. शेवटच्या आठ मिनिटांत तर भारतीय हद्दीतच खेळ चालला होता. यावेळी त्यांनी चार पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पण धाडसी आणि जिगरबाज खेळ करणाऱया भारताने उत्कृष्ट बचाव करीत ऑस्ट्रेलियाला रोखण्यात यश मिळविले. दीप ग्रेस एक्काने भक्कम बचाव व गोलरक्षक सवितानेही अप्रतिम गोलरक्षण केल्याने ऑस्ट्रेलियाला अखेर पराभवाला सामोरे जावे लागले.
अन्य एका सामन्यात अर्जेन्टिनाने जर्मनीचा 3-0 असा पराभव करून 2012 नंतर प्रथमच उपांत्य फेरी गाठली. जर्मनीने 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविले होते. बुधवारी भारत-अर्जेन्टिना यांच्यात उपांत्य लढत होईल.