रक्षाबंधनाला बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिला काहीतरी भेटवस्तू देतो. याच दिवशी बहीण भावाकडून आपले रक्षण करण्याचे वचन घेते. हरियाणातील रोहतक येथील निवासी राजन (वय 28) याने रक्षाबंधनापूर्वीच आपल्या बहिणीला अशी भेट दिली आहे, की जी तिच्यासमवेत तिच्या आयुष्यभर राहणार आहे. आपली बहीण प्रिया हिला त्याने आपले मूत्रपिंडच (किडनी) भेट दिले आहे.
प्रिया यांना मूत्रपिंडाच्या विकाराने त्रासले होते. डॉक्टरांनी मूत्रपिंड आरोपणाचा (किडनी ट्रान्सप्लांट) सल्ला दिला होता. तथापि, मूत्रपिंड कोण दान देणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. मूत्रपिंड घेण्यासाठी खर्चही मोठय़ा प्रमाणात करावा लागतो. तथापि, प्रिया यांचे बंधू राजन यांनी ही समस्या स्वतःचे मूत्रपिंड दान करून सोडविली. रक्षाबंधनाचा सण येत्या रविवारी आहे. ही घटना गुरुवारची आहे. रक्षाबंधनापूर्वीच तीन दिवस भावाने बहिणीसाठी हा महान त्याग केलेला आहे. गुरुवारीच शस्त्रक्रिया करून मूत्रपिंडाचे आरोपण करण्यात आले. आता बहिणीची प्रकृती स्थिर असल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिला आहे. भावाने बहिणीला दिलेली रक्षाबंधनाची ही अनोखी भेट रोहतक आणि परिसरात कौतुकाचा विषय झालेली आहे.