अधिकारी-ग्रामस्थांच्या बैठकीत कचरा डेपोला विरोध : आंदोलनाचा इशारा
वार्ताहर /हिंडलगा
मंडोळी येथील सरकारी गायरान जागेत कचरा डेपो उभारण्याचा घाट शासनाने घातला आहे. पण मंडोळी गावातील जनावरांसाठी इतर जागाच शिल्लक नसल्याने याठिकाणी कचरा डेपो उभारण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. सोमवार दि. 4 रोजी झालेल्या अधिकारी व ग्रामस्थांच्या बैठकीत देखील ग्रामस्थांनी आपली भूमिका ठाम घेतली असून कचरा डेपोला आपला कायम विरोधच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत मंडोळीतील सर्व्हे क्रमांक 201 च्या सरकारी गायरान जागेपैकी पाच एकर जागा संपादित करून त्यामध्ये कचरा डेपो उभारण्याचा घाट शासनाने घातला आहे. याबाबत ग्रामस्थांना माहिती मिळताच दि. 12 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देऊन कचरा डेपोला विरोध दर्शविला होता. त्यामुळे कचरा प्रकल्पाचे काम अद्यापही रखडले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी देखील मंडोळी गावची 168 एकर शेतजमीन संरक्षण खात्यासाठी संपादित करण्यात आली आहे, तर 10 एकर गायरान जमीन मोरारजी देसाई वसती शाळेला मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱयासाठी व इतर कारणांसाठी आता गावामध्ये सरकारी जमीन शिल्लक राहिली नाही. असे असताना पुन्हा उरल्यासुरल्या सर्व्हे क्रमांक 201 मधील पाच एकर जागेवर डोळा ठेवून त्या ठिकाणी कचरा डेपो उभारण्यासाठी प्रयत्न केल्याने ग्रामस्थांमध्ये शासनाविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची समजूत काढून कचरा प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी शासकीय अधिकाऱयांच्या उपस्थितीत ग्रामदैवत श्री मारुती मंदिरात बैठक घेण्यात आली होती. यावेळी उपस्थित तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर यांनी केंद्र सरकारमार्फत आलेल्या कचरा प्रकल्पाची माहिती दिली. तसेच प्रकल्पांतर्गत गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शासनाकडून पूर्ण मदत मिळणार असल्याचे सांगितले. शिवाय गावात कचरावाहू गाडीची सोय करणार असल्याचे सांगितले. पण कचरा डेपोमुळे गायरान जमीन जाण्याबरोबरच दुर्गंधी पसरून रोगराई होण्याचा धोका असल्याने ग्रामस्थांनी कचरा डेपोला पूर्णतः विरोध असल्याचे सांगितले. जबरदस्तीने डेपो उभारल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. बैठकीला साहाय्यक सचिव राजेश मोरबद, पीडीओ ज्योती मेठी यांच्यासह ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.