वेंगुर्ले/वार्ताहर-
पारंपारीक रापण मच्छिमारीस बाधा निर्माण झालेल्या नवाबाग किनाऱ्यावर ब्रेकवॉटरच्या कामासाठी सिमेंट काँक्रीटचे त्रिशंकू आकाराचे सिमेंटचे काँक्रीटचे चॅनल (टेट्रापॉड) हे अस्तावस्त टाकल्याने निर्माण झालेली समस्या व मच्छिमारांच्या रोजी रोटीवर होणारा परीणाम याचे रापण मच्छिमारांचे निवेदन मिळताच खासदार विनायक राऊत व आमदार दिपक केसरकर यांनी शुक्रवारी सायंकाळी भेट देऊन वस्तुस्थितीची पहाणी केली. सदरचे काँक्रीटचे चॅनेल 4 ते 5 दिवसांत तातडीने हटविण्यात येऊन रापण मच्छीमारांची गैरसोय दूर करण्यांत येईल. असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी मच्छिमारांना दिले.
पावसाळी हंगामात 1 ते 31 जुलै हा कालावधी मासेमारीसाठी बंदीचा काळ म्हणून शासनाने घोषित केलेला आहे. मात्र किनाऱयावरून केल्या जाणाऱ्या पारंपारिक मासेमारीला त्यात मुभा देण्यात आलेली आहे. पावसाळय़ाच्या सुरुवातीच्या काळात वादळीवारे व तुफान सदृश्य परिस्थिती सोडून इतर कालावधीत पारंपारिक रापण संघ रापणीव्दारे किनाऱ्यावरुन मासेमारी करतात तसेच बिगर यांत्रिक होडयाही किनाऱ्यालगत मासेमारी करतात. या एकमेव व्यवसायावर सर्वसामान्य मच्छिमारांची रोजीरोटी चालते.
रापण मच्छिमारी करण्याच्या भागात आधुनिक बंधारा (ब्रेकवॉटर) बांधकामासाठी तयार करण्यात आलेले सिमेंट काँक्रीटचे त्रिशंकू आकाराचे सिमेंटचे क्राँकीटचे दगड हे नवाबाग किनाऱ्यावर अस्ताव्यस्त टाकले गेल्याने पारंपारिक रापण मच्छिमारी व बिगर यांत्रिक मच्छिमारीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्यात मच्छिमारी केल्यास मच्छिमारांचे जाळी फाटून, होडी फुटून होडीचे तर अपघात होऊन मच्छिमारांच्या शरीरास दुखापती होऊन किंवा जिवीतहानी अशा स्वरूपांत फार मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सदरची त्रिशंकु दगडांना तातडीने हटवून पारंपारिक रापण संघाच्या मच्छिमार आणि पारंपारिक बिगर यांत्रिक मच्छिमारांना न्याय द्यावा. अशी मागणी सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी, मालवणचे सहाय्यक आयुक्त यासह खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर व स्थानिक प्रशासनाकडे केली होती.
यावेळी रापण जाळ्यांव्दारे मच्छिमारी करणाऱ्या मच्छिमारांची ब्रेकवॉटरचे बांधकामासाठी बनविण्यांत आलेले क्राँक्रीटचे चॅनेल रापण लावणीच्या जागेत अस्तावस्त टाकण्यांत आलेल्या वस्तुस्थितीची माहिती जेष्ठ मच्छिमार सुबोध खडपकर सह इतर मच्छिमारांनी दाखविली. सदरची वस्तुस्थिती जाणून घेऊन त्या भागातील ते क्राँक्रीटचे चॅनेल तात्काळ दुसऱ्या ठिकाणी हलिविण्याबाबत संबधित ठेकेदारास कळविण्यांत आलेले असून येत्या 4 ते 5 दिवसांत ते तातडीने हटविण्याचे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी मच्छिमारांना दिले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते, रूची राऊत, वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, उपजिल्हा प्रमुख सुनिल डुबळे, शहर प्रमुख अजित राऊळ, तालुका युवक प्रमुख पंकज शिरसाट, मच्छिमार सुबोध खडपकर, रामचंद्र आरावंदेकर, आनंद वेंगुर्लेकर, उत्तम आरावंदेकर, मोहन खराडे आदी उपस्थित होते.