प्रतिनिधी /मडगाव
ग्राहकाला एकाच वेळी, एकाच ठिकाणी अनेक वस्तू योग्य दरांत मिळण्यासाठी मडगाव रोटरी क्लबतर्फे आयोजित ऑटोमोबाईल्स, कन्झ्युमर, इंटिरिअर शो कन्झ्युमर्स शॉपी हे गृहोपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन रवींद्र भवन, मडगाव येथे 1 ते 5 डिसेंबर या कालावधीत आयोजिण्यात आले असून त्याचे उद्घाटन बुधवारी झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून दामोदर नाईक, अध्यक्ष, मडगाव रवींद्र भवन, सन्माननीय अतिथी या नात्याने नगराध्यक्ष लिंडन पेरेरा, रोटरी प्रांतपाल गिरीश धोंड, माजी नगराध्यक्षा कमलिनी पैंगीणकर, मडगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष मांगिरीश काकोडकर, प्रशांत कामत, रोटरी क्लबचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. संयोजिका मीनल मोहाडीकर यांनी सर्वांचे स्वागत केले.
ऑटोमोबाईल पॅव्हेलियनमध्ये विविध गाडय़ांचे ताजे मॉडेल्स पाहायला मिळणार असून यात टाटा मोटर्स, अशोक लेलँड, स्कॉडा, यामाहा, टीव्हीएस, होंडा जनरेटर, किर्लोस्कर ऑईल इंजिन, न्यू इंडिया ऍश्युरन्स, मारुती सुझुकी, होंडा, फोर्स मोटर्स, नेक्सा, ऑक्सव्हेगन, बीलाईव्ह यांचा समावेश आहे. तर कन्झ्युमर्स पॅव्हेलियनमध्ये टीटीके प्रेस्टिज लि., वाघ बकरी चहा, ऑलिव्हिया, ज्योती ऑक्सिजन, केंट, अपग्रेड, रामबंधू मसाले, ब्रिहन्स नॅचरल, वैद्य पाटणकर आयुर्वेदिक काढा, रिलॅक्सवेल मॅटेस, सिहॅथ कॅनिंग, कृषिधन, गेरी गॉन मॅड, नित्यम सोप्स, फॉरेस्ट प्रॅगरन्स, फोडा घाट फार्मसी, गोदरेज यमीज, पॉवरमॅक्स, सिमंधर, गिट्स, हेम कॉर्पोरेशन, फॅब्रिस्पा, ॐकार एन्टरप्राईझेस, प्रथम पेस्ट कंट्रोल, इमरान कारपेट, निखील अगरबत्ती, व्हिनस इंटरनॅशनल, स्मित फर्निचर, अनन्या क्रिएशन, अर्थिता, लस्टर मॅजिक, कृष्णा हर्बल कृषिधन आदी भारतातील नामांकित कंपन्या सहभागी झाल्या आहेत.
मोठय़ा कंपन्यांबरोबरच महिला व लघुउद्योजकही मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले आहेत. पाच दिवस चालणाऱया या प्रदर्शनात कूकर, नॉनस्टिक कूकवेअर, इन्स्टंट फूड्स, चहा, सौंदर्यप्रसाधने, डेअरी उत्पादने, फर्निचर, बॅग्ज, लहान मुलांचे कपडे, डेस मटेरियल, साडय़ा, किचन प्रॉडक्ट्स, खाद्यपदार्थ आदी अनेक गृहोपयोगी वस्तूंचा समावेश आहे. कन्झ्युमर्स शॉपी हे प्रदर्शन 5 पर्यंत रोज सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत सर्वांना विनामूल्य खुले राहील. तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी प्रदर्शनाला भेट देऊन खरेदीचा आनंद लुटावा, असे आवाहन संयोजिका मीनल मोहाडीकर यांनी केले आहे. प्रदर्शन चालू असतानाच 20 वर्षांवरील महिलांसाठी 3 रोजी सायंकाळी 4 ते 5 या कालावधीत बेस्ट आऊट ऑफ वेस्ट या विषयावर, तर 4 रोजी 10 वर्षांवरील मुलांसाठी चित्रकला स्पर्धा दुपारी 3.30 वा. आयोजित करण्यात आली आहे. चित्रकलेचा विषय स्पर्धेच्या वेळी सांगण्यात येईल. या स्पर्धांच्या अधिक माहितीसाठी मडगाव महिला मंडळ वा कन्झ्युमर्स शॉपीच्या स्वागत कक्षात संपर्क साधावा.