शनिवारी भव्य कार्यक्रम : हभप शिवलिलाताई पाटील यांच्या कीर्तनाचे आयोजन
वार्ताहर /हिंडलगा
मण्णूर येथील हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्यावतीने शिवजयंतीनिमित्त शनिवारी (दि. 19) आयोजित ‘श्री शिवजन्मोत्सव सोहळा 2022’ची मुहूर्तमेढ रोवून उत्साहात सुरुवात करण्यात आली.
येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात आयोजित कार्यक्रमप्रसंगी देवस्की पंच कमिटी अध्यक्ष मुकुंद तरळे यांच्या हस्ते पूजन करून शिवजयंती सोहळय़ाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, देवस्की पंच कमिटी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
हिंदवी स्वराज्य युवा संघटनेतर्फे युवकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. युवापिढी सदृढ बनावी यासाठी संघटनेतर्फे पुढाकार घेतला जातो. त्यानुसार यावर्षीही शनिवारी (दि. 19) सायंकाळी 7 वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात आयोजित श्री जन्मोत्सव सोहळय़ाप्रसंगी शब्दांच्या बळावर सर्वांच्या मनावर राज्य करणाऱया महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार हभप शिवलिलाताई पाटील यांच्या भव्य अशा कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी मण्णूर आणि परिसरातील शिवप्रेमी नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.