केंद्रीय जीएसटी व राज्य जीएसटी अधिकाऱ्यांची माहिती
अभय योजनेचाही लाभ घ्यावा -मनपा मध्ये जीएसटी कार्यशाळा
प्रतिनिधी / सांगली
सांगली मिरज कुपवाड मनपाकडून जीएसटी नोंदणी नसलेल्या किंवा नोंदणी रद्द केलेल्या काही व्यक्तींना, ठेकेदारांना जीएसटीच्या रक्कम देण्यात आल्याची माहिती पुढे आली असून त्यांच्याकडून जीएसटी वसूल केला जाईल अशी माहिती केंद्रीय जीएसटी ,सांगली तसेच राज्य जीएसटी अधिकारी यांनी दिली. दोन्हीं विभाग महसूल वृद्धीसाठी कार्यरत असून कर चुकवेगिरी रोखण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
केंद्रीय जीएसटी, तसेच राज्य जीएसटी, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जीएसटी कार्यशाळेत ही माहिती देण्यात आली. यावेळेस केंद्रीय जीएसटी, सांगली विभागाचे सहाय्यक आयुक्त के. राजकुमार, राज्य जीएसटी, सांगलीच्या उपायुक्त श्रीमती शर्मिला मिस्कीन, राज्य जीएसटी सहाय्यक आयुक्त राहुल रसाळ तसेच केंद्रीय जीएसटीचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर हे प्रमुख उपस्थित होते.
के राजकुमार म्हणाले, मनपाकडून चुकीच्या पद्धतीने जीएसटी घेतलेल्या सर्व व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरू असून त्यांच्याकडून कर वसूल केला जाईल. तसेच सध्या ३१ ऑगस्टपर्यंत सुरु असलेल्या विवरण पत्र अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
बोलताना श्रीमती शर्मिला मिस्कीन म्हणाल्या की, नोंदणी नसताना जीएसटी घेणे व तो शासनाकडे न भरणे ही गंभीर बाब असून याबाबत राज्य जीएसटी विभागाने याची तात्काळ दखल घेतली असून महापालिकेशी संपर्क साधून कर वसूल करण्याचे काम सुरू केले जात आहे. तसेच ठेकेदारांनी आपल्या वार्षिक उलाढाली संबंधी तरतुदी तपासून नोंदणी घ्यावी कारण नोंदणी असेल तर कर परतावा लाभ मिळू शकतो. यावेळी त्यांनी जीएसटी-टीडीएस तरतुदींची सविस्तर माहिती दिली. कायद्यानुसार बंधनकारक असलेल्या मनपा सह सर्व कार्यालयांनी आवश्यक तेथे टीडीएस कापून तो संबंधित जीएसटी विभागाकडे वेळेवर भरण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच टीडीएस तरतुदींचा भंग करु नये असे स्पष्ट केले. तसेच करदात्यांच्या नोंदणी किंवा कर भरणा विषयी सर्व अडचणी सोडविण्यासाठी दोन्ही जीएसटी विभाग कटिबद्ध असल्याचे सांगितले.
राजेंद्र मेढेकर यांनी महानगरपालिकाच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीने जेव्हा पुढील व्यक्ती जीएसटीची मागणी करत असेल त्यास जीएसटी रक्कम देताना त्याची नोंदणी आहे का किंवा असल्यास ती रद्द नाही ना किंवा तो कंपोझिशन योजनेखाली नाही किंवा त्याचा पुरवठा हा कर पात्र आहे किंवा कसे याची खात्री करून घ्यावी असे सांगितले. मनपा मुख्य लेखाधिकारी स्वप्नील हिरुगडे यांनी स्वागत केले तर उप आयुक्त चंद्रकांत आडके यांनी आभार मानले. संयोजन सिस्टिम मनेजर नकुल जकाते यांनी केले . आभासी पद्धतीने झालेल्या या कार्यशाळेस महापालिकेचे अधिकारी व महापालिकेचे ठेकेदार उपस्थित होते.