कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालच्या दौऱयावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसला शनिवारी मोठा झटका बसला. तृणमूलला रामराम ठोकलेल्या सुवेंदू अधिकारी यांच्यासह 11 आमदार व एका माजी खासदाराने कमळ हाती घेतले आहे. या महाभरतीनंतर अमित शाह यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. ‘…ही तर सुरुवात असून निवडणुकीपर्यंत एकटय़ाच राहणार’ असल्याचा इशारा शाह यांनी ममता बॅनर्जींना दिला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पश्चिम बंगालच्या दौऱयावर आहेत. त्यांच्या दौऱयादरम्यान भाजपने तृणमूल काँग्रेसविरोधात एल्गार पुकारला. शाह यांच्या उपस्थितीत तृणमूलमधून बाहेर पडलेल्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीआधी भाजपने आपले पाय बळकट करण्यास सुरूवात केली आहे. बंगालमध्ये आज भाजपचा झंझावात दिसून आला. सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीएमचे नेते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी पक्षात आले आहेत. वेस्ट मिदनापूर येथे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला.
येत्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजप आपला करिष्मा सिद्ध करेल. 200 पेक्षा अधिक जागा जिंकून भाजप सत्तेत येईल, असा दावा शाह यांनी केला आहे. तसेच बंगाली जनतेला हाक देत, ‘तुम्ही तीन दशके काँग्रेसला दिली. 27 वर्षे कम्युनिस्ट पक्षाला दिलीत. 10 वर्ष ममता दीदींना दिलीत. त्याचप्रमाणे आता केवळ भारतीय जनता पक्षाला पाच वर्ष द्या. आम्ही बंगालला सोन्यासारखे बनवू,’’ अशी ग्वाही त्यांनी दिली.