पोसेसांव वाडय़ावरील संशयितास अटक : घराच्या अंगणात गांजाची लागवड
प्रतिनिधी /पणजी
गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी (सीआयडी) मयडे येथे केलेल्या कारवाईत 10 लाख 50 हजार रुपये किमंतीचे विविध प्रकारचे ड्रग्ज जप्त केले आहेत. या प्रकरणात एका स्थानिक संशयिताला अटक केली असून संशयिताच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद करुन पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव रवी लक्ष्मण नाईक (34, पोसेसांव वाडा, मयडे) असे आहे.
अंगणात केली गांजाची लागवड
मयडे भागात मोठय़ा प्रमाणात ड्रग्जचा व्यवसाय सुरु असल्याची माहिती सीआयडी पोलिसांना मिळाली होती. तसेच अंगणात गांजाची लागवड केल्याचीही माहिती सीआयडीला मिळाली होती. सीआयडी पोलिसांनी नियोजनबध्द संशयिताच्या घरावर छापा मारला आणि संशयिताला रंगेहात अटक केली.
गांजा, चरस, गांजाची ताजी पाने जप्त
ही कारवाई गुरुवारी रात्री उशिरा करण्यात आली. संशयिताच्या ताब्यात असलेला 5 किलो 42 ग्रॅम गांजा, 1 किलो 08 ग्रॅम चरस, तसेच 5 किलो 350 ग्रॅम गांजाची ताजी पाने जप्त करण्यात आली आहेत. बाजार भावाप्रमाणात या ड्रग्जची किमंत सुमारे 10 लाख 50 हजार रुपये इतकी आहे.
सीआयडी निरीक्षक मंगेश वळवईकर, हवालदार संदीप मडकईकर, कॉन्स्टेबल समीउल्ला मकानदार, स्वप्नील सिमेपुरुषकर, धनंजय देविदास, रुपेश गायकवाड, गौरीश वांयगणकर, महिला हवालदार स्नेहा जवीर यांनी ही कारवाई केली. सीआयडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
गेल्या दोन वर्षांच्या कोविड काळात पर्यटक गोव्यात आलेच नाही त्यामुळे गोव्यात मोठय़ा प्रमाणात ड्रग्ज आला नव्हता. सर्वच ड्रग्ज डिलरांनी ड्रग्जचा साठा करून ठेवला होता. यावर्षी मोठय़ा प्रमाणात देशी विदेशी पर्यटक गोव्यात येऊ लागले असून डिसेंबर महिन्यात मोठय़ा प्रमाणात पाटर्य़ांचेही आयोजन होणार आहे. त्यामुळे ड्रग्ज व्यवसायिकांना तेजी येणार आहे. ड्रग्ज विक्रेत्यांनी मोठय़ा प्रमाणात गोव्यात ड्रग्ज आणल्याची माहिती असून त्याची विक्री करण्याची वाट पाहत आहेत. दुसऱया बाजूने गोवा सरकारने गोव्यातून ड्रग्ज पूर्णपणे नष्ट करण्याचा ठाम निर्णय घेतला असून पोलिसांना तशी ताकिद दिली आहे. सीआयडी, एएनसी तसेच गोवा पोलीस बेधडक कारवाई करीत असून अवघ्या दहा महिन्याच्या काळात कोटय़वधी रुपये किमंतीचा ड्रग्ज जप्त केला आहे. तसेच मोठय़ाप्रमाणात ड्रग्ज पॅडलरना अटक केली आहे.