प्रतिनिधी/ फोंडा
कवळे ग्रामपंचायतीतर्फे गोवा मुक्तीदिनाच्या हिरकमहोत्सवी सोहळय़ात ढवळी येथील युवा लेखक लघुपट दिग्दर्शक, संकलक व निर्माता महानंद गजानन सतरकर याचा गौरव करण्यात आला.
कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महानंदला सरपंच राजेश कवळेकर व इतर पंचसदस्यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून महानंद हा विविध ज्वलंत विषयांवर लघुपट तयार करुन सामाजिक संदेश देत आहे. त्याने काही कविताही रचल्या आहेत. कला क्षेत्रातील त्याच्या या योगदानाबद्दल सरपंच राजेश कवळेकर यांनी त्याची विशेष प्रशंसा केली. युवकांनी आपल्यातील कलागुणांचा योग्यवेळी आविष्कार घडवित समाजासाठी काहीतरी करुन दाखविण्याची इर्षा मनात बाळगावी. समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी असा संदेश त्याने आपल्या मनोगतात दिला. पंचसदस्य मनोज बोरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.