फिरोज मुलाणी/ पुणे
महाराष्ट्र केसरी किताबाची मानाची गदा लातूर का नाशिकला जाणार हे सोमवारी निश्चित झाले आहे. अनेकांचे अंदाज धुळीला मिळवून माती गटातून लातूरच्या शैलेश शेळकेने माऊली जमदाडेचे तुफानी आव्हान लिलया पेलत त्याला पराभवाची धूळ चारली तर गादी विभागात नाशिकच्या हर्षल सदगीरने महाराष्ट्र केसरी अभिजित कटकेला पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले. मंगळवारी सायंकाळी हर्षल आणि शैलेश महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवण्यासाठी झुंजणार आहेत.
माती गटात अंतिम फेरीत लातूरचा शैलेश शेळके आणि सोलापूरचा माऊली जमदाडे परस्परांशी भिडले होते. वजन उंचीने माऊली भारी असला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीचा अनुभव पणाला लावून सलामीला शैलेशने बँकथ्रो डावावर पाच गुणाची कमाई केली. पुढच्या मिनिटात साईड साल्तो मारण्याचा शैलेशचा डाव त्याच्याच अंगलट आला. आणि हीच संधी साधून माऊलीने ताबा घेऊन दोन गुण आणि तिथेच भारंदाज मारुन दोन गुण अशी चार गुण मिळवून आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या फेरीत शैलेश एक गुणाने आघाडीवर होता परंतु दुसऱया निर्णायक फेरीत शेळकेने आणखी तीन गुण घेत आघाडी वाढवली. त्यानंतर आक्रमक झालेल्या माऊलीने भारंदाज दुहेरी पटाची पकड करीत बरोबरी साधली तर शेवटी 24 सेकंद बाकी असताना पुन्हा दोन गुण घेऊन दहा गुणांची आघाडी घेतली. मात्र शेवटच्या काही क्षणातच शैलेशने पुन्हा हप्ते भरून बरोबरी साधली. ही कुस्ती बरोबरीत सुटली असली तरी शेवटच्या क्षणी शैलेशने घेतलेल्या निर्णायक गुणामुळे विजयाची माळ त्याच्या गळय़ात पडली. टाका (ता. औसा) येथील शैलेश प्रथमच खुल्या गटातून लातूरचे प्रतिनिधित्व करीत आहे. तो सेनादलात असून आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल येथे अर्जूनवीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. यापूर्वी कँडेट गटातून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले आहे ज्युनिअर नँशनल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. गादी गटात अंतिम फेरी पुणे शहराचा महाराष्ट्र केसरी अभिजित कटके आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात रंगली. सर्वच आघाडीवर अभीजीत तगडा वाटत होता. पहिल्या फेरीत त्याने एकरी पटाची पकड घेऊन दोन गुण खात्यात टाकले आणि हर्षवर्धन वर दबाव वाढवला. गुणांची कमाई करण्यासाठी पहिल्या फेरीत हर्षवर्धन अभीचा भक्कम बचाव भेदण्यात अपयशी ठरला. त्यामुळे पहिल्या फेरीत पिछाडीवर पडलेल्या सदगीरने दुसऱया फेरीत आक्रमक वाढवले धक्का मारून अभीला बाहेर काढून गुणांचे खाते उघडले. आणि लगेचच दुहेरी पटाची पकड घेऊन ताबा मिळवीत दोन गुण खिशात टाकून गुणांची आघाडी वाढवली. पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी निकराचा प्रयत्न करणारा अभीजीत अंतिम टप्प्यात थोडासा थकलेला दिसत होता. तर दमा खसाने आणि निर्णायक आघाडीमुळे आत्मविश्वास वाढलेल्या सदगीरने पुन्हा शेवटच्या 12 सेकंदात दोन गुण घेत बढत पाचवर नेहून ही प्रति÷sची लढत खिशात टाकून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आणि भुगावच्या अधिवेशनात अभीजीतकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढीत अनेकांचा अंदाज चूकवून गादी विभागात बाहुबली असल्याचे सिध्द केले.
कोंबहाळणी (ता. अकोले) येथील हर्षदचे वडील महेश शाळेत लिपिक आहेत मात्र त्याच्या आजोबाकडून त्याला कुस्तीचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती. स्पर्धेत 92 किलो वजनगटातील तो सुवर्णपदक विजेता आहे. तसेच आखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकूल येथे अर्जूनवीर काका पवार यांच्याकडे तो सराव करीत आहे.
तत्पूर्वी सेमी फायनल मध्ये सोलापूरच्या माऊली जमदाडेकडून बुलढाण्याचा गतवषीचा विजेता बालारफिक शेख याला पराभवाचा धक्का बसला. सलामीला दोन गुण घेऊन देखील माऊलीने त्याला वरचढ ठरु दिले नाही. हप्ते डावावर त्याला आसमान दाखवून डबल महाराष्ट्र केसरीचे स्वप्न धुळीस मिळवले. तसेच याच फेरीत गणेश जगताप (हिंगोली) आणि शैलेश शेळके यांच्यात अटीतटीचा सामना रंगला. दोन्ही आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात सराव करणाऱया दोघांना एकमेकांच्या डावाची पूरेपूर कल्पना होती. त्यामुळे दोघेही एकमेकवर गुण घेऊन बाजी मारण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र ग्रिकोरोमन कुस्तीतील डावांचा निर्णायक क्षणी वापर करून धोबी, समोरून भारंदाज, लपेट डावावर गणेशवर दोन गुणांनी विजय मिळवला. तर गादी गटात लातूरच्या सागर बिराजदारचे स्वप्न पुन्हा भंगले अभिजात कटकेशी लढताना नकारात्मक कुस्ती बद्दल त्याला दोन गुण गमवावे लागले शेवटच्या काही क्षणात त्याचे आक्रमक अपयशी ठरले. याच फेरीत मुंबईच्या सचिन यलभरला अंतिम फेरी गाठण्यास अपयश आले. दोन्ही फेऱयात आघाडी घेऊन हर्षदने त्याची डाळ शिजू दिली नाही.त्याला गुणाचे खातेही उघडता आले नाही.
बालेवाडी संकुलात सोमवारी सकाळी गुलाबी थंडीत खुल्या गटातील मल्लांच्या चित्तथरारक लढतीचा थरार चांगलाच रंगला. गणेश जगतापने सिंकदर शेखची विजयी घौडदौड थांबवली. अति घाई सिंकदरच्या अंगलट आली. गणेशने ढाक लावून त्याला चितपट केले. तर आक्रमक शैलेशने रत्नागिरीच्या संतोषला सहज नमवले. हर्षवर्धन सदगीरने कोल्हापूरचा संग्राम पाटीलला पराभवाचे पाणी पाजले. जखमी अवस्थेत संग्रामची झुंज त्याला विजयापर्यंत घेऊन गेली नाही. कुस्तीपंढरीचा गदेचा वनवास संपवण्यात त्याला अपयश आले.
सकाळच्या सत्रात 74 किलो वजनी गटातील माती विभागात अतीतटीची अंतिम फेरी रंगली होती. आपले सर्वस्व पणाला लावून जोशाने लढले. यात कोल्हापूरचा अनिल चव्हाण 74 किलो माती विभागात सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. अनिलने सोलापूर जिह्याच्या आबासाहेब मदनेला 10-6 गुणांनी हरवत सुवर्णपदक पटकावले. अत्यंत रोमांचक व प्रेक्षणीय लढत देत दोघेही मल्ल पूर्ण ताकदीने लढले. तर सांगलीच्या श्रीकांत निकमने कोल्हापूर शहराच्या प्रवीण पाटीलला 7-6 गुण फरकाने हरवत कास्यपदक मिळवले.
अंतिम निकाल –
74 किलो माती विभाग
सुवर्ण- अनिल चव्हाण (कोल्हापूर)
रौप्य ा आबासाहेब मदने (सोलापूर जिल्हा)
कांस्य- श्रीकांत निकम (सांगली)
आज कित्येक वर्षांनी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील दोन्ही मल्ल अंतिम फेरीत पोहचले होते. त्यामुळे दोघेही आनंदाने बेभान झाले होते. शैलेश शेळकेने तर गुरु काका पवार यांना खांद्यावर घेऊन मैदानाला फेरी मारून आपला आनंद व्यक्त केला. तर सदगीर काकांच्या पायावर बराच वेळ डोके ठेवून आनंदाश्रू गाळत होता. दोघांनी गुरुबद्दल व्यक्त केलेल्या भावनांनी उपस्थित हजारो कुस्ती शौकिन देखील भारावून गेले होते.