ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 48 तासात 222 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत 5935 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नागरिकांकडून काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी पोलीस तैनात आहेत. मात्र, कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील 48 तासात 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 74 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. सद्यस्थितीत राज्यात 1 हजार 144 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 4 हजार 715 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.