प्रतिनिधी /प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे, ‘मिनी यूपीए’ असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊतांनी केलेले हे वक्तव्य मोठे राजकीय वक्तव्य असल्याचे मानले जात आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या गोवा आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला साथ द्यायची नाही? या बाबत शिवसेनाप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेतली असे देखील राउत म्हणाले. “शिवसेना युपीएमध्ये जाते किंवा आणखी काहीतरी आघाडी होते, या चर्चा माध्यमांमध्ये जोरात सुरू आहेत. आम्ही ते वृत्तपत्रांमधून वाचतो किंवा मीडियातून ऐकतो. राहुल गांधींना आज मी नक्कीच भेटणार आहे. पण त्याला तुम्ही कर्टसी व्हिजिट का म्हणत नाही.” असे राऊत म्हणाले.
शिवसेना काँग्रेसच्या समर्थनार्थ
दरम्यान, ममताच्या मुंबई दौऱ्यानंतर देशात भाजपसमोर यूपीएशिवाय नवी विरोधकांची आघाडी उभी करण्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यातून त्याचा ‘शुभारंभ’ झाल्य आहे. खुद्द शरद पवारांनी त्याला दुजोरा दिल्यामुळे आणि पवारांसमोरच ममतादीदींनी “देशात यूपीए अस्तित्वात नाही”, असं विधान केल्यामुळे त्याला दुजोराच मिळाला आहे. पण शिवसेनेने मात्र काँग्रेसच्याच नेतृत्वाखालील यूपीएचं समर्थन केलं आहे. दरम्यान, सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला वगळून नवीन आघाडी उभी करण्याच्या प्रयत्नांवर सेनेने आक्षेप घेतला आहे.
देशात यूपीएला वगळून दुसरी आघाडी उभी करणं म्हणजे भाजपाला आयती मदत करण्यासारखंच असल्याची भूमिका सामनाच्या अग्रलेखात मांडण्यात आली आहे. “मोदींच्या पक्षाला आज एनडीएची गरज नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे, यूपीए समांतर दुसरी आघाडी स्थापन करणे हे भाजपाचे हात बळकट करण्यासारखेच आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए कुणाकुणाला मान्य नाही, त्यांनी जाहीरपणे हात वर करावेत. पडद्यामागून गुटरगूं करू नये”, असं शिवसेनेकडून सुनावण्यात आलं आहे.