चित्रपट, मालिकांच्या चित्रिकरणासाठी चित्रनगरी सज्ज, पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली चित्रनगरीची पाहणी
प्रतिनिधी/कोल्हापूर
पुणे-मुंबईमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने किमान चार-पाच महिने तरी तेथे शुटींग सुरू होणे अशक्य आहे. चित्रपट सृष्टीच्या आर्थिक विकासासाठी चित्रनगरीसह जिल्हय़ातील शुटींग स्पॉट विकसित केले जाणार आहेत. मे महिना अखेरपर्यंत चित्रनगरीत मालिका, चित्रपटांचे शुटींग सुरू झाल्यावर लाईट, कॅमेरा, ऍक्शनचा आवाज कोल्हापूरकरांच्या काणावर घुमणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी चित्रनगरीची पाहणी करून, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञांशी चर्चा केली. चर्चे दरम्यान चित्रीकरणासाठी आवश्यक त्या सर्व सुविधांची पूर्तता करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकारांबरोबर चित्रनगरी परिसरासह स्टुडीओची पाहणी केली. येथे शुटींग करण्यासाठी कोणत्या गोष्टीची कमतरता आहे, याचा आढावा घेत, चित्रनगरीसाठी 4 कोटी रूपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी 2 कोटी रूपयांची वर्क ऑर्डर दिलेली आहे. यातून चित्रनगरीत फ्लोअर, रेल्वे टॅकसह सर्व तांत्रिक सुविधाही दिल्या जातील, असे सांगितले.
चित्रनगरी, जयप्रभा स्टुडिओ, शालिनी सिनेटोन, रंकाळा शुटींग करण्यास परवानगी द्यावी. तसेच शुटींगसाठी ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी आदींच्या परवानगीमध्ये भरपूर वेळ जातो. या परवानग्या लवकर मिळाव्यात. दवाखाना, कार्पोरेट ऑफीस आणि कोर्ट, रेल्वे ट्रक, फ्लोअर, विमानतळ अशा अनेक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निर्माते, दिग्दर्शकांनी केली. यावर पालकमंत्री सतेज पाटील यांनी एका दिवसात स्थापत्य विभाग, वनखाते, पालीस प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय आदी परवानग्या देवून, शुटींगचे सर्व स्पॉट उपलब्ध करून देण्यात येतील, असे सांगून निर्मात्यांचा आनंद व्दिगुणीत केला. यावेळी झालेल्या चर्चेत प्रोडाक्शन मॅनेजर मिलिंद अष्टेकर, अभिनेता स्वप्नील राजशेखर, अभिनेता आनंद काळे, निर्माता विकास पाटील, प्रोडाक्शन मॅनेजर रवींद्र गावडे, सतीश बिडकर, सुनील भोसले, शशांक पवार, देवेंद्र चौगले, अश्विन सावनूर, संग्राम पाटील, सर्जेराव पाटील, अमर मोरे, अजय खडे, ललित चिकसकर आदी उपस्थित होते.
चित्रिकरणासाठी लागणाऱया सुविधांसाठी लिंक तयार करू
चित्रपट, मालिका यांच्या चित्रिकरणासाठी लागणाऱया सुविधांसाठी लिंक तयार करून त्यावर निर्माते, दिग्दर्शक यांना लागणाऱया सुविधांसाठी अर्ज केल्यास त्या सुविधा त्वरीत पुरवल्या जातील. चित्रनगरीचे शहरात बोर्ड लावण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी केल्या. मोरेवाडीमध्ये ज्यांची घरे भोड तत्वावर द्यायची आहेत, त्याची यादी तयार करा, ही घरे चित्रनगरीला पाहिजे तेंव्हा भाडे तत्वावर देता येतील.
मोरेवाडीतील लोकांना काम द्या
चित्रनगरीमध्ये शुटींग सुरू झाल्यानंतर छोटी-मोठी कामे मोरेवाडीतील लोकांना द्यावीत. त्यामुळे मोरेवाडी ग्रामपंचायतमधील बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल. निर्माते, दिग्दर्शकांना पाहिजे ते सहकार्यही मिळेल. –सरपंच रामदास मोरे (मोरेवाडी)