बिरनहोळीच्या केंपगुद्दी टेकडी परिसरातील दुर्घटना : यमकनमर्डी पोलीस स्थानकात घटनेची नोंद
वार्ताहर / यमकनमर्डी
बिरनहोळी गावातील केंपगुद्दी टेकडीच्या भागात खोदकाम सुरू असताना मातीचा ढिगारा अंगावर कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. सोमवार 1 रोजी ही दुर्घटना घडली आहे. यल्लप्पा भरमप्पा हरिजन (वय 22, रा. करगुप्पी, सध्या रा. बिरनहोळी) आणि हालप्पा ईरप्पा गुरव (वय 24, रा. बिरनहोळी) अशी घटनेतील मृतांची नावे आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, येथील केंपगुद्दी टेकडीच्या भागात दररोज खोदकाम सुरू असते. तसेच सदर माती ट्रक्टरमध्ये भरून त्याची इतरत्र वाहतूक करण्यात येते. सोमवारी सकाळीही नेहमीप्रमाणे काम सुरू होते. यल्लप्पा आणि हालप्पा माती भरण्यासाठी गेले होते. दरम्यान, सखल भागात राहून ट्रक्टरमध्ये माती भरत असताना अचानक टेकडीवरील मातीचा ढिगारा कोसळला. या ढिगाऱयाखाली दोघेही गाडले गेले. श्वास गुदमरल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.
दोघे कामगार मातीखाली गाडून मृत झाल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच यमकनमर्डीचे पीएसआय रमेश पाटील यांनी आपल्या सहकाऱयांसह घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. घटनेची नोंद यमकनमर्डी पोलीस स्थानकात झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
यल्लाप्पा आणि हालप्पा हे दोघे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी माती भरण्यासाठी नियमितपणे जात होते. सोमवारी सकाळीही ते दोघे नेहमीप्रमाणे कामावर गेले. काम सुरू असतानाच मात्र काळाने अचानक घाला घातल्याने त्यांचा मातीखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला. हरिजन याच्या पश्चात आई आणि विवाहित बहीण असून कुटुंबातील तो एकुलता एक होता.