कोरोना संसर्गवाढीचा परिणाम : बेंगळूर मनपाकडून कठोर उपाययोजना
प्रतिनिधी /बेंगळूर
बेंगळूरमध्ये कोरोनाची तिसरी लाट सुरू होण्याच्या टप्प्यात असल्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकार आणि बेंगळूर महापालिकेने कठोर उपाययोजना केल्या आहेत. शहरात कोरोनाचे अधिक रुग्ण असणारा परिसर मायक्रो कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित केला जात आहे. शहरात अशा मायक्रो कन्टेन्मेंट झोनची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सध्या येथे 160 हून अधिक कन्टेन्मेंट झोन असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
राज्याच्या राजधानीत कोरोनाचा फैलाव पुन्हा वेगाने होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खबरदारी म्हणून शहरातही नाईट कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. आवश्यकता भासली तर आगामी दिवसांत आणखी कठोर निर्बंध जारी करणार असल्याचे महसूलमंत्री आर. अशोक यांनी सांगितले आहे.
बेंगळूर शहरातील विविध भागात 160 हून अधिक मायक्रो कन्टेन्मेंट झोन निर्माण करण्यात आले आहेत. येथे 648 जणांना कोरोनाबाधित रुग्ण आहेत. बोम्मनहळ्ळी विभागात सर्वाधिक 24 मायक्रो कंटेन्मेंट झोन असून येथे 77 रुग्ण आढळले आहेत. तर 2,235 जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. यलहंका विभागात 20 मायक्रो कंटेन्मेंट झोन असून 77 रुग्ण आढळले आहेत. तर येथे 2,247 जण क्वॉरंटाईनमध्ये आहेत. शहरातील सर्व आठ विभागांमध्ये एकूण 5,860 जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
तिसरी लाट सप्टेंबरपासून?
ऑगस्टच्या शेवटऱया आठवडय़ात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात बेंगळूरमध्ये संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार व महापालिकेने खबरदारी उपाययोजना केल्या आहेत. 16 ऑगस्टपासून शहरात घरोघरी आरोग्य कर्मचाऱयांचे पथक पाठवून तपासणी केली जाणार आहे.