सांडपाणी घुसले कुबेर अर्बन पतसंस्थेत
वार्ताहर / माशेल
माशेल येथील मध्यावर्ती विष्णू स्मृती इमारतीच्या बाजूला पाणी साचू लागल्याने तेथील लोकांना आरोग्याच्या दृष्टीने धोका निर्माण झाला आहे. सांडपाणी उघडयावर सोडू लागल्याने काही दुकानासह एका पतसंस्थेच्या कार्यालयात सांडपाणी घुसले होते. याप्रकरणी बेतकी आरोग्य केंदात तक्रार नोंदविल्यानंतरही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.
प्राप्त माहितीनुसार गेल्या कित्येक महिन्यापासून विष्णू स्मृती इमारतीच्या गाळयातील मलनिस्सारणाचे पाणी सोकपीटात न झिरपता उघडयावर सोडून दिले आहे. त्यामुळे येथे पाण्याचे डबके निर्माण झाले आहे. त्यात डांसाची पैदास झाल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. इमारतीच्या बाजूला अनेक बंगल्याचा परिसर यासंबंधी आरोग्य केंद्रात अनेक तक्रारी दिल्यानंतरही कोणतीच कारवाई होत नसल्याची तक्रार येथील रहिवासियांनी केली आहे. ज्या ठिकाणी डबका तयार झालेला त्याला लागुनच कुबेर अर्बन पतसंस्थेतही पाणी घुसण्याचे प्रकार यापुर्वी झालेले आहेत. मात्र तरीही फ्लॅटधारक पाणी डबक्यात सोडण्य़ाचे प्रकार सुरू आहेत. सदर इमारतीत मिठाई दुकानदार असून या दुर्गधीमुळे त्याच्या गिऱहाईकावरही परिणाम झालेला आहे. यासंबंधी बेतकी आरोग्य केंद्राने त्वरीत लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे.