बेळगावातही होणार अंमलबजावणी
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी कर्नाटकात मास्क सक्तीचे करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क न घालणाऱयांना 1 हजार रुपये दंड आकारण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. बेळगावातही त्या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.
पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी सोमवारी एका पत्रकाव्दारे ही माहिती दिली आहे. 1 ऑक्टोबरपासून कर्नाटकात हा आदेश जारी आहे. 7 ऑक्टोबरपासून बेळगावात या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क घालणे सक्तीचे आहे.
कोरोना महामारी थोपविण्यासाठी बेळगावकरांनी प्रशासनाशी सहकार्य करावे. बुधवार दि. 7 ऑक्टोबरपासून मास्क न घालणाऱयांना 1 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पोलीस प्रशासनाशी सहकार्य करण्याचे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले आहे.