मिरज सुधार समितीकडून चौकशीची मागणी
मिरज / प्रतिनिधी
मिरज शहरतील ख्वाजा वसाहतीत नैसर्गिक नाला बुजवून गुंठेवारी प्लॉट पाडल्याचा प्रकार मिरज शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला आहे. बफर झोन असतानाही महापालिका आणि महसूल प्रशासनाने येथील प्रस्तावाला मंजुरी कशी दिली ? असा सवाल करीत याची याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी सुधार समितीने केली आहे.
ख्वाजा वसाहत येथे बऱ्याच वर्षाचा 20 फुटी नैसर्गिक नाला आहे. या नाल्यातून झारीबाग, शिवाजीनगर, रेल्वे स्थानक परिसर, समतानागर, मणिकनगर, गंगरनगर आदी भागातील सांडपाणी वाहत असते. शहरात थोडा देखील जोमानं पाऊस पडला तर, नाल्याशेजारील वसाहतीत पाणी शिरतो. 20 फुटीच्या नाल्याभोवती अतिक्रमण होऊन हा नाला 10 फुटी राहिला आहे.
काही दिवसांपासून हा भागातील लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने नैसर्गिक नाला मुजवून केवळ दोन फुटी व्यासाची पाईपलाईन करून नाला पूर्णपणे मुजविला आहे. या बाबत या भागातील रहिवाशांनी मिरज शहर सुधार समितीकडे तक्रारी केल्यानंतर बुधवारी मिरज सुधार समितीने पाहणी केल्यानंतर हा भोंगळ कारभार उघडकीस आला. या बाबत सुधार समितीने महापालिका आणि महसूल विभागाकडे तक्रार करून संबंधित मिळकतदारावर कारवाईची मागणी केली आहे.