विद्युत खांबावर कावळा अडकल्याने झाले शॉर्ट सर्किट
प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरातील लक्ष्मी मार्केट येथील महापालिकेच्या महात्मा गांधी उद्यानात बुधवारी दुपारी अचानक आग लागली. विद्युत खांबावर कावळा अडकल्याने शॉर्ट होऊन ही आग लागल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित वा वित्त हानी झाली नाही. अग्निशामनच्या जवानांनी तात्काळ आग विझवली.लक्ष्मी मार्केट इमारती समोर महात्मा गांधी उद्यान आहे. या उद्याना पाठीमागेच महापालिकेचे विभागीय कार्यालय आहे.
तसेच उजव्या बाजूला हाकेच्या अंतरावर अग्निशमन विभाग आहे. या बगीचाच्या पाठीमागील बाजूस एका विद्युत खांबाशेजारी कचऱ्याचा ढीग आहे. बुधवारी दुपारी या विद्युत खांबावरील विद्युत तारेला एक कावळा अडकला.
त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन खांबावर आग लागली. आगीच्या ठिणगी खालील कचऱ्यावर पडल्याने कचऱ्यालाही आग लागली. त्यामुळे धुराचा लोट उठला. अग्निशमन विभागाचे जवान सचिन जगताप, सागर गायकवाड, देविदास मानकरी यांनी बंबाच्या पाणी ओतून आग विझवली.