आयपीएल साखळी सामना -चेन्नईतील खेळपट्टी संथ गोलंदाजीला पोषक असल्याने हैदराबादसमोर चिंता
चेन्नई / वृत्तसंस्था
तुलनेने सरस भासणाऱया मुंबई इंडियन्सविरुद्ध लढण्यापूर्वी सनरायजर्स हैदराबादसमोर योग्य सांघिक समतोल साधण्यावर भर देण्याचे आव्हान असणार आहे. अर्थात, चेन्नईची खेळपट्टी मंदगती गोलंदाजीला अधिक पोषक असल्याने ही त्यांची मुख्य चिंता असणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता या लढतीला सुरुवात होईल.
डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील सनरायजर्स हैदराबादला अगदी 150 पेक्षा कमी धावसंख्येचा पाठलाग करण्यातही अपयश आले असून पहिल्या दोन्ही सामन्यातील त्यांची कामगिरी टीकेचे लक्ष्य ठरत आली आहे. त्यातच केकेआरविरुद्ध दमदार विजय संपादन केला असल्याने मुंबईचे मनोबल येथे उंचावलेले असेल, हे साहजिक मानले जाते.
सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरसाठी अंतिम एकादश निवडताना बऱयाच समस्यांची उकल करावी लागणार आहे. या संघाने जॉनी बेअरस्टो व वृद्धिमान साहा, असे दोन यष्टीरक्षक एकाच वेळी खेळवले. मात्र, यापैकी साहा सलामीला अगदीच निष्प्रभ ठरल्याने त्यांची ही चाल निष्फळ गेली आहे. आश्चर्य म्हणजे साहा 2008 मधील आयपीएलच्या उद्घाटनाच्या आवृत्तीसह प्रत्येक हंगामात खेळत आला आहे. पण, त्याच्या कामगिरीत सातत्याचा प्रचंड अभाव राहिला आहे.
केदार जाधव, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा यांच्यासारखे खेळाडू डगआऊटमध्ये राखीव खेळाडूत असताना साहाचा हा खराब फॉर्म हैदराबादसाठी विशेष चिंतेचा आहे. विदेशी खेळाडूत केवळ वॉर्नर व रशीद खान यांचेच अंतिम संघातील स्थान निश्चित रहात आले आहे.
केन विल्यम्सन पुढील आठवडय़ातच खेळू शकेल, असे सध्याचे संकेत असून मनीष पांडे, अब्दुल समद यांनी आरसीबीचा डावखुरा फिरकीपटू शाहबाज नदीमसमोर ज्या प्रकारे क्रॉस-बॅट फटके खेळत आपल्या विकेट्स फेकल्या, त्याने वॉर्नरला देखील धक्का बसला होता. साहजिकच, शाहबाजपेक्षा अधिक सरस मारा करणाऱया कृणाल पंडय़ासमोर पांडे व समद नव्या गेमप्लॅनसह उतरले नाहीत तर येथे हैदराबाद संघाला फटका बसण्याची शक्यताच अधिक असेल.
मनीष पांडेला मुख्य करार श्रेणीतून डच्चू मिळाला आहेच. मात्र, सामने जिंकून देणाऱया फिनिशरची भूमिका बजावता आली नाही, हे त्याच्या अपयशाचे मुख्य कारण राहिले आहे. सर्वात कमी स्ट्राईक रेटने 3 हजार आयपीएल धावा जमवणाऱया पहिल्या पाच फलंदाजांमध्ये मनीष पांडेचा समावेश राहिला असून ही त्याची कमकुवत बाजू ठरत आली आहे.
प्रतिस्पर्धी संघ
मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा (कर्णधार), सुर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंग, ख्रिस लिन, सौरभ तिवारी, धवल कुलकर्णी, जसप्रित बुमराह, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, मोहसिन खान, हार्दिक पंडय़ा, जयंत यादव, केरॉन पोलार्ड, कृणाल पंडय़ा, अनुकूल रॉय, इशान किशन, क्विन्टॉन डी कॉक, आदित्य तरे, ऍडम मिल्ने, नॅथन काऊल्टर नाईल, पीयूष चावला, जेम्स नीशम, युद्धवीर चरक, मार्को जान्सन, अर्जुन तेंडुलकर.
सनरायजर्स हैदराबाद ः डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), केन विल्यम्सन, विराट सिंग, मनीष पांडे, प्रियम गर्ग, वृद्धिमान साहा, जॉनी बेअरस्टो, जेसॉन रॉय, श्रीवत्स गोस्वामी, विजय शंकर, मोहम्मद नबी, केदार जाधव, जे. सुचित, जेसॉन होल्डर, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, रशीद खान, टी. नटराजन, संदीप शर्मा, खलील अहमद, सिद्धार्थ कौल, बसिल थम्पी, शाहबाज नदीम, मुजीब उर रहमान.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 पासून.