ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईमधील एका पबवर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये सदर ठिकाणी माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खान, गायक गुरु रंधावा आणि इतर सेलिब्रिटी उपस्थित होते. तर रॅपर बादशाहने यावेळी पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती उघड होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई एअरपोर्टजवळ असलेला ड्रॅगन फ्लाय क्लब रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवण्यात आला होता. तसेच क्लबमध्ये कोरोना नियमांचे पालन देखील करण्यात आले नव्हते, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. या क्लबच्या ग्राहकांमध्ये सेलिब्रिटी देखील असून यामध्ये 34 ग्राहकांसह 7 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी एएनआयशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, माजी भारतीय क्रिकेटर आणि इतर काही सेलिब्रेटींसोबत एकूण 34 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाशी संबधित नियमांचे पालन न केल्याने तसेच वेळमर्यादा संपल्यानंतरही क्लब सुरु ठेवण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्यात मंगळवारी रात्रीपासून 5 जानेवारीपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.