देशातील पालीच्या नवीन प्रजातीचा शोध
प्रतिनिधी / आटपाडी
भारताच्या प्राणी संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या युवा प्राणी संशोधकांच्या टीमने देशाच्या पश्चिम घाटातुन पालीच्या नवीन प्रजातीचा शोध लावला असुन जागतिक पातळीवर या संशोधनावर शिक्कामोर्तब झाला आहे. आटपाडी तालुक्याचा सुपुत्र अक्षय खांडेकर याच्यासह तेजस ठाकरे, सौनक पाल, ईशान अगरवाल या तरूणांनी पालीच्या संशोधनाच्या निमित्ताने देशाचे आणि जगाचे लक्ष वेधले आहे.
आटपाडी तालुक्यातील हिवतड गावचा सुपुत्र अक्षय खांडेकर हा युवा प्राणी संशोधक म्हणुन मागील काही वर्षांपासुन देशभरात सरपटणाऱ्या आणि विशेषत: पालींच्या संशोधनात योगदान देत आहे. अक्षय आपला सहकारी मित्र ईशान अगरवाल याच्यासह ठाकरे वाइल्डलाईफ फौंडेशन मुंबई आणि नॅशनल सेंटर फॉर बायलॉजिकल सायन्सेस बेंगलोर येथे कार्यरत आहे. तेजस ठाकरे हा ठाकरे वाइल्डलाईफ फौंडेशन मुंबईमध्ये कार्यरत आहे. तर सौनक पाल हा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबईमध्ये कार्यरत आहे.
प्राणीशास्त्रातील संशोधनात मागील काही वर्षापासुन एकत्रित काम करणाऱ्या या चार युवा प्राणी संशोधकांनी २०१४ मध्ये सर्वप्रथम कर्नाटक राज्यातील सकलेशपुर येथील उभ्या दगडांच्या शिळांमध्ये शोधमोहीम राबविली. ही नवीन प्रजाती असलीतरी भारताच्या पश्चिम घाटातील या कुळातील पुर्वी नोंद झालेल्या पालींशी तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी नमुने उपलब्ध नसल्याने या संशोधनावर शिक्कामोर्तब होण्यास विलंब झाला. या टीमने २०१८ मध्ये पश्चिम घाटात या कुळातील अन्य प्रजातींचा शोध करून नमुने संकलीत करून संशोधनाला गती दिली.
फेब्रुवारी २०१९मध्ये अक्षय खांडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालीच्या नवीन प्रजातीचे संशोधन सादर केले. ते झुटाक्सामध्ये प्रसिध्द झाले. अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे, सौनक पाल, ईशान अगरवाल यांनी संशोधन केलेल्या पालीचे नामकरण नामकरण ‘निमास्पिस मॅग्निफिका’ असे करण्यात आले आहे. ही पाल मोठ्या आकाराची व सुंदर आहे.
पालीच्या नवीन प्रजातीचे इंग्रजी नामकरण ‘मॅग्निफिसंट ड्वार्फ गेको’ असे करण्यात आले आहे. ही नवीन जात प्रदेशानिष्ठ असून फक्त पश्चिम घाटातील सकलेशपूर (कर्नाटक) भागात असणाऱ्या दगडांच्या मोठ्या शिळांवरती आढळते. ‘निमास्पिस’ या कुळातील बहुतांश पाली दिनचर असल्या तरी याच कुळातील ही नवीन जातीची पाल मात्र निशाचर म्हणजेच फक्त रात्री सक्रिय असते. निमास्पिस या कुळातील नोंद असलेल्या आकारांनी सर्वाधिक मोठ्या पालींपैकी ही एक प्रजाती आहे व तिची लांबी ५८ मिलिमीटर इतकी आहे. या कुळातील इतर पालींपासून सहज वेगळी ओळख असणाऱ्या या प्रजातीमुळे देशासह जगातील पालीच्या जातीत भर पडली
मुख्यमंत्र्याच्या सुपुत्राचाही सहभाग
देशातील पालींच्या नवीन प्रजातीच्या शोधात महत्त्वपुर्ण योगदान देणाऱ्या टीममधील युवा प्राणी संशोधक तेजस ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या कुटुंबातील हा युवा संशोधक राजकीय व्यासपीठाऐवजी प्राणीशास्त्रात संशोधक म्हणुन देशाच्या संशोधनात आपल्या सहकाऱ्यांसह भरीव योगदान देत आहे.