प्रतिनिधी / वास्को
कोरोनामुळे देशात आणि देशाबाहेरही काही ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योग जगताला प्रचंड फटका बसलेला आहे. गोव्यातील एकमेव मुरगाव बंदरही त्याला अपवाद नाही. हा आर्थिक कणाही ढासळलेला असून मागच्या सोळा दिवसांत बंदराला जवळपास चाळीस कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या औद्योगिक शहरातील जवळपास सर्वच उद्योग व्यवसाय ठप्प असून बंदर ओस पडण्याबरोबरच शहरातही अवकळा पसरल्याचे दृष्य पाहायला मिळते.
वास्को शहर आणि परिसर बहुरंगी आणि बहुढंगी म्हणून ओळखला जातो. या परिसरात स्थानिक लोकांबरोबरच मोठय़ा प्रमाणात परप्रांतीय लोक स्थायिक झालेले आहेत. मुरगाव तालुका हा औद्योगिक तालुका असल्याने या सबंध तालुक्यात संमिश्र लोकसंख्या आणि मिश्र संस्कृती निर्माण झालेली आहे. याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवरही दिसून येतो. स्थानिक गोवेकरांपेक्षा स्थायिक बिगरगोमंतकीयांचीच अधिक वर्दळ वास्कोतील बाजारपेठेत दिसत असते. व्यापारीही मोठय़ा प्रमाणात वास्को परिसरात स्थायीक झालेलेच लोक आहेत. मिश्र संस्कृतीने हा बाजार सतत गजबजलेला असतो. मात्र, सद्यस्थितीत या शहराचे आणि बाजारपेठेचे दृष्यच पालटलेले आहे. सर्वच व्यापार आणि उद्योग व्यवसाय बंद असल्याने शहरात अवकळा पसरलेली आहे. इथे औद्योगिकरणाचे मुळ असलेले मुरगाव बंदरही कधी नव्हते, एवढे ओस पडलेले आहे.
मुरगाव बंदरात अत्यावश्यक सेवाच जारी
देशात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मुरगाव बंदरातील व्यवहार जवळपास ठप्पच आहेत. केंद्रीय जहाजोद्योग मंत्रालय आणि डीजी शिपिंगच्या मार्गदर्शक तत्वांनुसार काही अत्यावश्यक सेवाच बंदरात सुरू आहेत. गरजेनुसार किरकोळ मनुष्यबळाचा वापर त्यासाठी होत असतो. त्यामुळे मुरगाव बंदरातील एमपीटीचे कामगार, कर्मचारी, अधिकाऱयांबरोबरच खासगी कंपन्या व कंत्रांटी मनुष्यबळ सध्या घरीच बसून लॉकडाऊनच्या आज्ञेचे पालन करीत आहे. अत्यावश्यक सेवा कायदय़ानुसार काहींना बोलावणे येताच कामावर हजर व्हावे लागते. या कायदय़ाचे पालन कामगार कर्तव्य म्हणून करीत असल्याची माहिती काही कामगारांनी दिली.
कोळसा व पेट्रोलियम पदार्थांची अत्यावश्यक सेवांतर्गंत हाताळणी
देशभर लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून मुरगाव बंदरात विदेशातून येणारी जहाजे आणि मुरगाव बंदरातून विदेशात जाणारी जहाजे बंदच असून देशातील लॉकडाऊनच्या समस्येबरोबरच जगातील इतर देशातही काही ठिकाणी लॉकडाऊन असल्याने त्याचाही परिणाम देशभरातील आणि जगभरातील बंदरांवर झालेला आहे. अनेक जहाजे अनेक बंदरांमध्ये अडकून पडलेली आहेत. एमपीटी व मुरगाव बंदरातील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बंदरात सध्या पेट्रोलियम पदार्थ आणि कोळसा या मालाचीच मर्यादित हाताळणी होत आहे. कोळसा उर्जा निर्मितीसाठी आवश्यक असल्याने त्याची आयात पूर्णपणे थांबवणे शक्य नाही. तसेच बंदरात विदेशातून येणारे पेट्रोलियम पदार्थ रोखले गेल्यास लॉकडाऊनच्या काळात मोठय़ा संकटाला आमंत्रण देणारे ठरणार आहे. बंदरातील सर्व व्यवहार बंद व्हावेत, असा दबाव सरकारवर प्रारंभी आला होता. मात्र, यासंबंधी चर्चा झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी अत्यावश्यक सेवा कायदय़ांतर्गंत बंदरातील ही हाताळणी रोखण्याचे टाळल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.
काही देशांतील जहाजांवर कडक निर्बंध
अत्यावश्यक सेवा घेऊन येणाऱया जहाजांना मुरगाव बंदराचा मार्ग मोकळा असला तरी चीन, इटाली व इतर कोरोनाग्रस्त प्रांतांतील जहाजांना मुरगाव बंदरात प्रवेश करण्यावर कडक निर्बंध आहेत. त्यांना थेट प्रवेश देण्यात येऊ नये असाही मंत्रालयाचा आदेश आहे. कामगार व कर्मचाऱयांची सुरक्षा महत्वाची असल्याने बंदरातील व्यवहारांसाठी डीजी शिपिंगने काही विशिष्ट मार्गदर्शक तत्वे अंमलात आणलेली आहेत. त्यांचे पालन करून हा व्यवहार होत आहे. देशभरातील सर्वच प्रमुख बंदरांमध्ये याच मार्गदर्शक तत्वांनुसार व्यवहार सुरळीत चालू आहेत. मात्र, इतरांच्या तुलनेत मुरगाव बंदरातील व्यवहार अधिकच ठप्प झालेला असल्याची माहिती मिळाली.
अन्नधान्य, खाद्य उत्पादन व औषध उत्पादन व्यवहारांसाठी मोकळीक
उपलब्ध माहितीनुसार मुरगाव बंदरात कोळसा आणि पेट्रोलियम पदार्थाबरोबरच अन्नधान्याच्या जहाजांना प्रवेश खुला आहे. औषध कंपन्यांच्या निर्यातीसाठीही सागरी मार्ग खुला आहे. स्थानिक अत्यावश्यक मालाचे उत्पादन करणाऱया उद्योगांसाठी लागणारा कच्चा मालही मुरगाव बंदरात आयात होत असून तो रोखणेही कायदय़ानुसार शक्य नाही. गोव्यातून अनेक उद्योग व लघू उद्योगांचे खाद्य उत्पादन निर्यात होत असते. त्यांच्या निर्यातीवर रोख आलेली नाही. अन्न धान्य, खाद्यपदार्थ तसेच औषधी माल व कच्चा माल कंटेनरव्दारेच हाताळला जात असतो. मागच्या पंधरा दिवसांत मुरगाव बंदर जवळपास चाळीस कंटेनर हाताळले गेलेले आहेत. मुरगाव बंदरात निर्यातीपेक्षा अधिकाअधिक मालाची आयात होत असते. अत्यावश्यक आयातच सध्या हाताळली जात आहे. एक खनिजवाहू जहाजही काही दिवसांपूर्वी हाताळण्यात आले. तसेच कोळसावाहू जहाजही हाताळण्यात आले.
रेल्वेमार्गे कोळसा वाहतुकही अडचणीत
दरम्यान, मुरगाव बंदरात कोळसा उपलब्ध झाला तरी या मालाची गोव्याबाहेर रेल्वेमधून होणाऱया वाहतुकीवर मनुष्यबळाअभावी निर्बंध आलेले आहेत. लॉकडाऊनमुळे सर्वच बंद असल्याने कष्टाची कामे उरकणाऱया कामगारांना जेवण खाण्याची समस्या भेडसावत असल्याने त्यांनीही या कामाकडे पाठ फिरवल्याची माहिती मिळाली. या समस्येमुळे लोहमार्गे होणारी कोळसा वाहतुक रोडावली आहे.
एमपीटीला 40 कोटींच्या नुकसानीचा अंदाज
लॉकडाऊनच्या गेल्या सोळा दिवसांतील काळात मुरगाव बंदरातील व्यवहार ठप्प झाल्याने एमपीटीला 31 मार्चपर्यंत जवळपास 25 कोटींचा आर्थिक फटका बसला होता. आतापर्यंत ही आर्थिक झळ जवळपास 40 कोटीच्या घरात पोहोचली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.