प्रतिनिधी /पणजी
गोव्यात आतापर्यंत 32 कोरोना रुग्णांना ‘म्युकर मायकोसिस’ अर्थात काळय़ा बुरशीचा आजार जडल्याची नोंद झाली आहे. आरोग्य खात्याच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या आजाराने 14 जणांचा मृत्यू झाला असून उर्वरितांवर उपचार चालू आहेत.
मागील मे महिन्यात या आजाराचा पहिला रुग्ण गोव्यात सापडला होता. त्यानंतर 4-5 महिने संपल्यावर त्या आजाराचे रुग्ण वाढल्याचे समोर आले आहे. वाढत्या रुग्णांची संख्या पाहून गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात विशेष वॉर्ड सुरू करण्यात आला असून तेथे ते उपचार घेत आहेत.
गेमेकॉत विशेष वॉर्ड, आरोग्य पथक
कोरोना झालेल्या किंवा त्यातून बरे झालेल्यांना त्या आजाराची लागण झाली होती. अजुनही ती लागण संपलेली नाही. रुग्णांची संख्या 32 पर्यंत वाढणे ही त्या आजाराची संसर्गता दाखवते. अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी गोमेकॉत वैद्यकीय पथकही नेमण्यात आले असून असे रुग्ण आढळले तर त्यांना या विशेष वॉर्डात दाखल केले जाते, अशी माहिती सुत्रांनी दिली.
मधुमेह झालेल्या तसेच जास्त स्टेरॉईड औषधे घेतलेल्या रुग्णांना सदर आजाराचा धोका अधिक असून सध्या 32 रुग्णांपैकी 18 जण सक्रिय रुग्ण असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.