म्युच्युअल फंड्स इन इंडिया असोसिएशनची माहिती : आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये सिस्टिमेटीक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (सिप) अंतर्गत म्युच्युअल फंडांमध्ये 13 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. सदरची गुंतवणूक ही आजपर्यंतची सर्वाधिक मानली जात आहे. सिपच्या माध्यमातून गुंतवणूकदार दीर्घकालीन फायदा मिळवण्यासाठी अधिकाधिक गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त होत आहे. म्युच्युअल फंडांकडे गुंतवणूकदारांचा ओढा अधिक प्रमाणात वाढला आहे.
याआधीच्या सप्टेंबर महिन्यामध्ये 12,976 कोटींची गुंतवणूक झाली होती. म्युच्युअल फंड्स इन इंडिया असोसिएशनने गुंतवणुकीसंबंधीची माहिती दिली आहे. गेल्या मे महिन्यापासून म्युच्युअल फंडांमध्ये सिपच्या माध्यमातून सरासरी 12 हजार कोटींची गुंतवणूक होताना दिसते आहे. जुलैमध्ये 12,140 कोटी, जूनमध्ये 12,276 कोटी आणि मे मध्ये 12,286 कोटींची गुंतवणूक सिपच्या माध्यमातून झालेली पाहायला मिळाली आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांमध्ये एकंदर 87 हजार कोटींची गुंतवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
शेअरबाजार हा जागतिक बाजारातील परिस्थितीवर नजर ठेवून व्यवहार करत असतो. सध्याला बाजार पुन्हा तेजीचा सूर पकडत असून हाच फायदा उठवण्यासाठी जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल दिसतो आहे. म्युच्युअल फंडांमध्ये लोकांचा विश्वास अधिक वाढतो आहे. नवी खातीही पाहता ऑक्टोबर महिन्यामध्ये एकूण 9.52 लाख सिप खाती उघडण्यात आली आहेत. एकंदर 5.93 कोटी इतकी सिप खाती सध्याला झाली आहेत.
गुंतवणुकीसाठी सोयीस्कर पर्याय
दर महिना कमीत कमी 500 रुपये गुंतवण्याच्या सोयीस्कर पर्यायामुळे अनेक जण म्युच्युअल फंडांमध्ये रस घेत आहेत. जवळपास 43 कंपन्यांची म्युच्युअल फंड्स बाजारामध्ये आहेत. यांनी जवळपास ऑक्टोबरमध्ये 9,390 कोटींची गुंतवणूक प्राप्त केली आहे.