दोन अधिकाऱयांचा हेलिकॉप्टर विभागात समावेश, युद्धनौकांवरून कार्यरत भारतातील पहिल्या महिला ‘एअरबोर्न टेक्निशियन’
प्रतिनिधी/ नवी दिल्ली
भारतीय नौदलानेही आता महिला अधिकाऱयांवर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यास सुरुवात केलेली असून पहिल्यांदाच हेलिकॉप्टर विभागात दोन महिलांची ‘निरीक्षक’ (एअरबोर्न टेक्निशियन्स) म्हणून निवड झाली आहे. यामुळे आघाडीवर राहणाऱया युद्धनौकांवर महिलांना तैनात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सब-लेफ्टनंट कुमुदिनी त्यागी आणि सब-लेफ्टनंट रिती सिंग यांना हा सन्मान प्राप्त होणार आहे.
युद्धनौकांच्या डेकवरून काम करणाऱया त्या भारतातील पहिल्या महिला ‘एअरबोर्न टेक्निशियन्स’ असतील. हे ऐतिहासिक पाऊल उचलताना नौदलाने 17 जणांमधून या दोन अधिकाऱयांची निवड केली आहे. दोन्ही महिला ‘निरीक्षक’ एका खास पथकाच्या भाग होत्या. त्यांना हवाई नेव्हिगेशन, उड्डाण प्रक्रिया, हवाई युद्धाचे डावपेच, पाणबुडीविरोधी युद्ध, तसेच ‘ऍव्हियोनिक सिस्टम्स’चे प्रशिक्षण दिले गेले आहे. आतापर्यंत महिलांचा प्रवेश समुद्रतटावरून उडणाऱया आणि तेथे उतरणाऱया ‘फिक्स्ड विंग’ विमानांपुरता सीमित होता.
सब-लेफ्टनंट कुमुदिनी त्यागी आणि सब-लेफ्टनंट रिती सिंग या नौदलातील 17 अधिकाऱयांच्या गटाचा एक भाग आहेत. या गटात चार महिला अधिकाऱयांचा समावेश होता. कोची येथील आयएनएस गरूड येथे झालेल्या कार्यक्रमात ’निरीक्षक’ म्हणून पदवी प्रदान करण्यात आल्यावर सर्वांना ’विंग्स’ देऊन सन्मानित करण्यात आले. या समारंभात चीफ स्टाफ ऑफिसर (प्रशिक्षण) रिअर ऍडमिरल अँथनी जॉर्ज यांनी सर्व अधिकाऱयांना पुरस्कार दिले. ते म्हणाले की, प्रथमच महिलांना ‘हेलिकॉप्टर ऑपरेशन्स’चे प्रशिक्षण घेतल्यानंतर युद्धनौकांवर तैनात केले जाणार आहे. हा विशेष प्रसंग आहे.
‘राफेल’साठीही महिला वैमानिकाची निवड
नौदलाच्या या निर्णयाची बातमी आली त्याचदिवशी हवाई दलानेही एक मोठे पाऊल उचलले आहे. राफेल लढाऊ विमानांच्या उड्डाणासाठी एका महिला वैमानिकाचीही निवड करण्यात आली आहे. सध्या सदर महिला वैमानिकाचे प्रशिक्षण सुरू आहे. लवकरच ही वैमानिक ‘स्क्वॉड्रन-17’ची भाग बनेल. कारगिल युद्धाच्या वेळी प्रथमच हवाई दलाने महिला वैमानिकांना सक्रिय मोहिमेत सहभागी केले होते. 2016 मध्ये सरकारने लढाऊ विमानांचे उड्डाण हाताळण्यास महिला वैमानिकांना परवानगी दिली. त्यानंतर आतापर्यंत 10 महिला वैमानिकांची नेमणूक करण्यात आली आहे.