ऑनलाईन टीम / किव्ह :
रशिया आणि युक्रेन यांच्यात दहा दिवसांपासून सुरू असलेले युद्ध शिगेला पोहचले असतानाच रशियाने तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात जाण्यासाठी ग्रीन कोरिडोर बनवण्यासाठी हा युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ले तीव्र केल्यामुळे युक्रेनबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. आठवडाभरातच जवळपास दहा लाख नागरिकांनी युक्रेनबाहेर स्थलांतर केले आहे. दरम्यान, युक्रेनमध्ये इतर देशातील विद्यार्थी आणि नागरिक अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी संबंधित देशांचे प्रयत्न सुरू आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये वाटाघाटींसाठी चर्चेच्या दोन फेऱ्या पार पडल्या. यानंतरही तोडगा निघाला नसल्याने संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर आता रशियाने युक्रेनमध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात जाण्यासाठी काही तासांचा युद्धविराम जाहीर केला आहे.
रशियाने मॉस्कोच्या वेळेनुसार सकाळी 10 वाजल्यापासून युद्धविराम घोषित केला असून, काही तासांसाठीचा हा युद्धविराम असणार आहे. त्यामुळे नागरिकांना मारियुपोल आणि व्होल्नोवाखा सोडण्याची परवानगी देण्याचीही मागणी झाली आहे.