किएव्ह / वृत्तसंस्था
रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या दोन प्रांतांमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे युद्धाची शक्यता बळावली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनचे दोन प्रांत स्वतंत्र झाल्याची घोषणा आधी केली होती. या प्रांतांच्या संरक्षणासाठी रशियन सैन्य तेथे पोहचल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र, अमेरिकेने रशियाला गंभीर परिणामांचा इशारा दिला असून ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स आदी राष्ट्रांनी युक्रेनच्या बाजूने आपण आहोत, अशी घोषणा करताना रशियावर शब्द मोडल्याचा आरोप केला आहे. ब्रिटनने रशियाच्या तीन बँकांवर निर्बंध घातले असून तीन अतिश्रीमंत व्यक्तींच्या सर्व व्यवहारांवर बंदी घालण्याची घोषणा मंगळवारी संध्याकाळी केली आहे.
गेले पंधरा दिवस युद्धाच्या छायेत वावरणाऱया युरोपमध्ये या घडामोडींमुळे खळबळ उडाली आहे. अधिकृत युद्धाची घोषणा अद्याप झाली नसली तरी रशियन सैन्याच्या दोन प्रांतांमधील प्रवेशामुळे युद्धाची भडका केव्हाही उडू शकतो, अशी परिस्थिती आहे. तसे झाल्यास त्याचे जगभरात पडसाद उमटून जगाची व्यवस्था विस्कळीत होऊ शकते, असा इशारा अनेक तज्ञांनी दिला आहे.
ब्रिटनकडून दुजोरा
रशियाचे सैन्य युक्रेनच्या काही भागांमध्ये घुसल्याच्या वृत्ताला ब्रिटनने दुजोरा दिला आहे. युक्रेनमध्ये रशियाचे आक्रमण सुरु झाले आहे, असे वक्तव्य ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांनी केले. युक्रेनचे अध्यक्ष क्लोडिमिर जेलेन्स्की यांनी रशियाच्या या घुसखोरीला आम्ही घाबरत नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही कोणाकडूनही काही घेतलेले नाही, तसेच कोणालाही काही देणारही नाही. रशियाचा आम्हाला धोका असला तरी आमच्या सीमारेषेत कोणतेही परिवर्तन होणार नाही, असे स्पष्ट करतानाच त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची या महत्वाच्या प्रश्नावर तातडीने बैठक बोलवावी अशी आग्रही मागणीही केली.
भारताकडून चिंता
रशियाने युक्रेनमध्ये प्रवेश केल्याच्या वृत्तावर भारताने चिंता व्यक्त केली आहे. सुरक्षा परिषदेत भारताचे प्रतिनिधी टी. एस. गुरुमूर्ती यांनी वक्तव्य केले. रशियाच्या या धोरणाने जागतिक शांततेचा भंग होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. त्यांनी युक्रेनमधील भारतीय नागरीकांच्या सुरक्षेसंबंधीही चिंता व्यक्त केली.
अमेरिकेचा इशारा
युपेनच्या दोन प्रातांचे स्वातंत्र्य घोषित करणे आणि तेथे सुरक्षेसाठी सैन्य पाठविणे हा युक्रेनवर आक्रमण करण्याचे निमित्त रशियाने शोधले आहे. रशियाने यापुढे जर घुसखोरी चालूच ठेवली तर गंभीर परिणाम होतील. आम्हाला स्वस्थ बसता येणार नाही. तसेच कोणालाही कुंपणावर बसून राहता येणार नाही. युरोपातील देशांसह आम्ही रशियाला प्रत्युत्तर देऊ. नंतर कोणालाही थांबता येणार नाही, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडन यांनी दिला.
248 भारतीय परतले
युद्धाच्या छायेत असणाऱया युक्रेनमधून भारतीय नागरीकांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने एअर इंडियाचे एक विमान पाठविले. हे विमान मंगळवारी रात्री 248 भारतीयांना घेऊन परतले. या देशाच्या विविध भागांमध्ये भारताचे 20 हजारांहून अधिक नागरीक आहेत. त्यांची सुरक्षा ही भारताची प्राथमिकता असेल. त्यांच्या सुरक्षेसाठी सर्व प्रयत्न करण्यात येतील असे केंद्र सरकारने स्पष्ट केले.
पाश्चिमात्य देशांमुळेच…
युक्रेनच्या दोन प्रांतांचे स्वातंत्र्य आम्हाला युरोपियन देशांच्या दबावामुळेच घोषित करावे लागले. आम्ही अजूनही या प्रश्नावर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यास सज्ज आहोत. युक्रेनच्या डोनबारा भागात रक्तरंजित संघर्ष करण्याचा आमचा हेतू नाही. हे दोन प्रांत स्वतंत्र झाल्याची घोषणा 2014 मध्येच तेथील फुटीरतावाद्यांनी केली होती. आता आम्ही या घोषणेला मान्यता दिली, असे रशियाचे म्हणणे आहे.
रशियाशी व्यापार बंद
अमेरिकेने मंगळवारी संध्याकाळी रशियाशी व्यापार बंद करण्याची घोषणा केली. रशियावर आर्थिक दबाव आणण्यासाठी आणखी पावले उचलण्यात येतील, असा इशारा अमेरिकेने दिला. ब्रिटन आणि फ्रान्सनेही रशियावर कारवाई केली जाईल, अशी भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे युद्धास प्रारंभ होण्याची शक्यता बळावली.
परिणाम काय होतील ?
युक्रेनसंबंधात रशिया आणि इतर देश यांच्यात युद्ध सुरु झाल्यास त्याचे गंभीर परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेला भोगावे लागणार आहेत. विशेषतः कच्च्या इंधन तेलाचे दर वाढल्यास भारतासारख्या देशांसमोर त्यांचा काही दोष नसतानाही समस्या उभी राहणार आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये या तेलाचा दर 100 डॉलर्स पर्यंत पोहचला आहे. तो आणखी वाढल्यास भारतासह जगासमोरही संकट उभे राहील. इतरही पदार्थांची महागाई वाढणार असे संकेत आहेत,