नवी दिल्ली / वृत्तसंस्था
18 राज्ये व केंद्रशासित प्रदेशाच्या क्रीडामंत्र्यांनी मंगळवारी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे कोव्हिड-19 नंतर क्रीडा चळवळीला नव्याने कशी चालना देता येईल, याबद्दल आपल्या नियोजनाची माहिती सुपूर्द केली. दोन दिवसांच्या व्हर्च्युअल बैठकीचा मंगळवारी पहिला दिवस होता. सर्व राज्यातील ऑलिम्पिक स्तरीय प्रशिक्षण व तळागाळापासून क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी केंद्रीय मंत्रालयाने जे प्रयत्न केले, त्याचा या राज्य क्रीडामंत्र्यांनी आवर्जून उल्लेख केला.
‘सर्व क्रीडामंत्री व पदाधिकाऱयांनी अतिशय मोलाच्या सूचना केल्या आहेत. कोव्हिड-19 नंतरचे क्रीडा पर्व कसे असेल, याबद्दल त्यांनी मांडलेली रुपरेषा निश्चितच विशेष महत्त्वाची आहे’, असे रिजिजू यांनी बैठकीनंतर पत्रकाद्वारे नमूद केले. आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, कर्नाटक, केरळ, लडाख, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगण, उत्तराखंड, पश्चिम बंगाल या राज्याचे प्रतिनिधी मंगळवारी झालेल्या सत्रात उपस्थित राहिले. बुधवारी दुसऱया सत्रात अन्य राज्ये व केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधी आपले नियोजन सादर करणार आहेत.
‘सर्व राज्ये अतिशय उत्तमरित्या प्रयत्न करत आहेत आणि केंद्रीय मंत्रालय सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे. भविष्यात क्रीडा संस्कृती पूर्वपदावर आणण्यासाठी हे सर्व प्रयत्न निश्चितच सार्थकी लागतील’, असा विश्वास रिजिजू यांनी क्रीडा मंत्र्यांना संबोधित करताना व्यक्त केला. प्रत्येक जिल्हय़ात खेलो इंडियाचे केंद्र स्थापन करणे व ‘एक राज्य, एक क्रीडा प्रकार’ ही संकल्पना राबवणे यासाठी सर्व राज्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे ते म्हणाले.
‘सर्व राज्ये आपल्या ऍथलिटना अन्य क्रीडा प्रकारासाठीही निवडू शकतात. पण, एक किंवा दोन क्रीडा प्रकारांवरच त्यांचे अधिक लक्ष केंद्रित असेल’, याचा त्यांनी उल्लेख केला. नेहरु युवा केंद्र संघटना व राष्ट्रीय सेवा योजनेबद्दलही या बैठकीत चर्चा झाली. जेव्हा परिस्थिती पूर्वपदावर येईल, त्यावेळी स्वयंसेवक नेमले जातील आणि त्यांच्या माध्यमातून जनजागृती केली जाईल, असे रिजिजू यांनी शेवटी नमूद केले.