18 ते 44 वयोगटातील 99 टक्के कैद्यांचे लसीकरण
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असून 49 कारागृहांपैकी 39 कारागृहांमध्ये एकही रुग्ण नाही. कारागृह प्रशासनाने केलेल्या खबरदारी उपाययोजनांमुळे कारागृहांमधील कोरोना संसर्गाचा धोका कमी झाला आहे. राज्यातील 10 कारागृहांमध्ये मोजकेच रुग्ण बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक अलोक मोहन यांनी दिली.
बेंगळूरच्या परप्पन अग्रहार कारागृहात सध्या पाच कैदी कोरोनाबाधित असून त्यांना क्वारटाईन करण्यात आले आहे. कारागृहाच्या नव्या इमारतीमध्ये या कैद्यांसाठी स्वतंत्रपणे क्वारंटाईन करण्यात आले आहे. कारागृह खात्याने कैद्यांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले असून 18 ते 44 वयोगटातील 99 टक्के कैद्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. या कैद्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. 45 वर्षांवरील सर्व कैद्यांनाही पहिला डोस देण्यात आला असून सुधारित लसीकरण नियमानुसार ते दुसरा डोसही घेत आहेत, अशी माहितीही अलोक मोहन यांनी दिली.
राज्यातील विविध कारागृहांमध्ये 15 हजारहून अधिक कैदी आहेत. त्यापैकी 2,167 कैदी 45 वर्षांवरील आहेत. त्यांना आरोग्य-कुटुंब कल्याण खाते व जिल्हा प्रशासनाच्या मदतीने लस दिली जात आहे, असेही ते म्हणाले.
1,120 कैद्यांची सुटका
सुप्रिम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे कर्नाटकात 1,120 कैद्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. त्यापैकी 370 जणांची पॅरोलवर तर 625 जणंची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. उर्वरित कैद्यांनी जन्मठेपेची आणि 14 वर्षांचा कारावास पूर्ण केला आहे, अशी माहिती अलोक मोहन यांनी दिली आहे.