अनधिकृत बांधकाम करणाऱयांवर कारवाई करण्याचा इशारा
प्रतिनिधी /बेळगाव
बुडाच्या कार्यक्षेत्रात येणाऱया राखीव जागेत अनधिकृतरित्या बांधकाम करण्यात येत होते. याबाबतची माहिती बुडा कार्यालयाला मिळाल्याने रामतीर्थनगर येथील वसाहतीमधील इमारतीचे बांधकाम हटविण्याची कारवाई बुधवारी करण्यात आली. तसेच अनधिकृत बांधकाम करणाऱयांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
नव्याने निर्माण केलेल्या विविध वसाहतींमध्ये राखीव आणि सार्वजनिक उपयोगासाठी जागा ठेवण्यात आल्या आहेत. मात्र सर्व्हे क्र. 529 व 534 मधील खुल्या जागेत अतिक्रमण करून इमारत बांधण्याचे काम सुरू होते. याबाबत बुडा अधिकाऱयांकडे माहिती उपलब्ध झाली. त्यामुळे सदर अनधिकृत बांधकामाची चाचपणी करून बुधवारी ही इमारत हटविण्यात आली. इमारतीचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू होते.
बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांच्या आदेशानुसार सदर इमारत जेसीबीच्या साहाय्याने हटविण्याची कारवाई करण्यात आली.
कार्यकारी अभियंते एस. सी. नायक, ए. ई. हिरेमठ, ए. ई. प्रसन्ना व माळमारुती पोलीस स्थानकाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. अनधिकृत ले-आऊटमध्ये कोणतेही भूखंड खरेदी करू नका, असे आवाहन बुडाच्यावतीने करण्यात आले आहे.