राशिवडे / वार्ताहर
राशिवडे येथील इंदीरानगर वसाहतीमध्ये राहणाऱ्या हॉटेल व्यावसायिक दिलीप आनंदा शिंदे यांच्या घरातुन रोख दहा हजाराच्या रक्कमेसह सव्वातीन लाखाच्या दागीन्यांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. या घटनेची राधानगरी पोलीस ठाण्यात नोंद झाली असुन सायंकाळच्यावेळी झालेल्या या चोरीमुळे राशिवडे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबतची माहिती अशी की, दिलीप शिंदे हे इंदीरानगर वसाहतीमध्ये राहतात. दि.२९ रोजी सायंकाळी ४ ते ७ च्या दरम्यान घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी दरवाज्यातुन घरात प्रवेश करून किचन कट्ट्यावरील डब्यातील चावीचा वापर करुन लोखंडी कपाटातुन चार तोळ्याचे चिताक, नेकलेस अडीच तोळे, कानातील जुबे अर्धातोळा, रिंगा दीड ग्रँम, चांदीचे कडे व रोख रक्कम दहा हजार असे मिळुन तीन लाख सव्वीस हजाराचा ऐवज लंपास करण्यात आला. अधिक तपास पो.नि. आप्पासो कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्री.खान,पो.कॉ.कृष्णात खामकर करत आहेत.